Ameya

Saturday 21 September 2019

Shree Swami Samarth original photo ameya jaywant Narvekar




  1. श्री स्वामी समर्थांची सत्ता या अखिल ब्रह्मांडावर आहे. सकळ प्राणीमात्रांमध्ये चैतन्य श्री स्वामींमुळे आहे.असा स्वमिभाक्तांचा ठाम विश्वास आहे. आणि त्याची प्रचीती त्यांना येतेच. स्वामींचे प्राण्यांवर खूप प्रेम होते.त्यांच्या सानिध्यात गायी,बैल,घोडे,कुत्रे नेहमीच असायचे. स्वामींना त्यांच्याविषयी विशेष जिव्हाळा होता.त्यांना ते प्रेमाने भरवत, त्यांच्या पाठीवरून हात फिरवत. निर्वाण समयी स्वामींनी सेवेकर्यांना आज्ञा केली होती कि सर्व जनावरांना मज जवळ आणा.
    स्वामींनी त्यांच्या अंगावर आपल्या शाली, छाट्या टाकल्या होत्या,खूप प्रेमाने आणि करुणेने त्यांच्या अंगावरून हात फिरवला होता. आणि कसे काय कुणास ठाऊक त्या मुक्या जनावरांना सुद्धा कळले होते कि स्वामी आता जाणार. गायी वासरांच्या, घोड्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते.गायी हंबरडा फोडत होत्या.


    स्वामी एके दिवशी राजवाड्यात झोपाळ्यावर राजाशी चर्चा करत होते.राजवाड्यातील देवघरात आप्पा सलभ पुजारी चंदन उगाळत होता.तेवढ्यात तिथे एक उंदीर आला आणि दिव्यातील वात खाऊ लागला. अप्पा सलभला संधी मिळताच हातातील चंदनाचे खोड त्या इवल्याशा उंदरावर फेकून मारले.उंदीर जागीच गतप्राण झाला. अप्पा मोठ्या ऐटीत उंदराची शेपटी धरून त्यास फेक्याला बाहेर जाऊ लागला. स्वामींनी हे पाहिले. त्या माउलीला राजा-रंक समान,सर्व भक्तांवर सारखीच माया मग तो उंदीर सुद्धा तितकाच अधिकारी.स्वामींचे हृदय कळवळले. त्यांनी अप्पाला आज्ञा केली.'ए तो उंदीर इकडे आण'. स्वामींनी उंदीर हातात घेऊन झोपाळ्याच्या कड्यांमधून त्याला आत बाहेर केले. आणि प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवून 'जाव बच्चा' अशी आज्ञा केली.उन्दिरामध्ये तत्काळ प्राण येउन तो ताडकन उडी मारून पळाला उपस्थितांना मोठा विस्मय आणि अप्पाला खूप पश्चाताप वाटला.

    अक्कलकोटात एक ब्रिटीश अधिकारी वास्तव्यास होता. बंबगार्डन साहेब नाव त्याचे.तो स्थानिक लोकांना तुच्छ लेखायचा. एका स्वामी भक्ताला लाथ मारल्यामुळे त्याचा पाय व्याधी होऊन सडत गेला आणि पाय कापण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नसता स्वामींना शरण गेल्यामुळे स्वामींनी तो पाय त्यांच्या कृपादृष्टीने बरा कसा करून करून दाखवला त्याची कथा पुढे येईल च.
    असो. या बंबगार्डन साहेबाकडे एक सुंदरी नावाची वांदरी पाळलेली होती.पुढे ती पिसाळली, येणाऱ्या जाणार्या माणसांना ती चावे. लहान मुलांना बुचकरे.त्यामुळे बंबगार्डन साहेब कंटाळून शिपायांना तिला गोळ्या घालून ठार मारण्याचा हुकुम केला.
    शिपाई बंदूक घेऊन तिला शोधत होते.मागून धावत पळत होते. पण ती काही त्यांच्या हाती येईना. अशात स्वामींचा निजभक्त भुजंगा च्या कानावर हि गोष्ट आली. त्याने तडक स्वामींना सांगितले कि ह्या गोर्या साहेबाने त्याच्या शिपायांना पिसाळलेल्या वांदरीला गोळ्या घालून ठार मारण्याचा हुकुम दिला आहे. स्वामी भूजंगला म्हणाले. जा तिला सांग मी बोलावलंय. आज्ञा प्रमाण असे समजून भुजंगा तडक तिथे पोहोचला जिथे ती वांदरी कोंडीत अडकून त्या शिपायांना शरण आली होती.शिपाई तिला गोळ्या घालणार इतक्यात भुजंग म्हणाला थांबा तिला गोळ्या घालू नका.
    आणि वांदरीला सांगितले ए चल तुला स्वामींनी बोलावलंय.
    असे म्हणताच ती शहाण्या माणसा सारखी त्याच्या पाठून चालू लागली.
    वडाखाली स्वामी बसले होते.तिथे ती श्रींच्या चरणी आली. श्री रागावून तिला म्हणाले.काय ग चावटे!!! लोकांना चावतेस. पुन्हा चावशील तर लाख लाख कोरडे मारू.असे म्हणताच ती उन्मत्त वांदरी स्वामींच्या पायाशी गडाबडा लोळू लागली.
    पुढे ती वांदरी श्रींची स्वारी जीथे असेल तिथे जात असे.श्रींनी दिलेला प्रसाद खात असे.स्वामी कधी कधी तिच्या डोक्यावर आपली टोपी घालत.ती पुढे मरे पर्यंत स्वामींसन्निध होती. मरताना सुद्धा तीने श्रींच्या चरणावर आपला प्राण सोडला. गावकर्यांनी आणि सेवेकर्यांनी तिची वाजत गाजत, बुक्का उडवत   मिरवणूक काढली आणि अंत्यसंस्कार केले.

    स्वामी एके दिवशी नजीक च्या गावात लगबगीने निघाले होते. जवळ च एक निम्बाचे झाडावर एक चिमणी बसली होती. तिला बघून स्वामी म्हणाले तू कुठे जाऊ नकोस हा!! मी येई पर्यंत येथेच थांब. पुढे संध्याकाळ होता होता श्रींची स्वारी परत अक्कलकोटास  यायला निघाली. वाटेवर ते झाड लागले.आणि आश्चर्य. ती चिमणी तशीच त्याच फांदीवर बसून होती.
    सर्व लोकांना विस्मय वाटला. स्वामी तिजकडे पाहून म्हणाले.'जा ग आता तुला भूक लागली असेल'!!असे म्हणताच ती भुर्कन उडून गेली.

    स्वामी मंगळवेढ्यात असताना एका कृष्णभट नावाच्या ब्रह्मणा घरी गेले.त्याजवळ खाण्यास दशमी मागितली.ब्राम्हण निर्धन असला तरी त्याजवळ गोधन होते. पण ती गाय भाकड होती. दुध देत नसे.तरी ब्राम्हण खूप प्रेमाने तिची सेवा करत होता.
    स्वामींना दशमी हवीय म्हणून दुध आणण्यासाठी ब्राम्हणाची पत्नी लगोलग तांब्या घेऊन बहर जात असता ब्राम्हणाने
    श्रींना विनंती केली."महाराज माझी पत्नी दुध घेऊन येईपर्यंत वाट पहावी लागेल. माफी असावी. पण दुध आणल्यावर चटकन ती तुम्हाला दशम्या करून खायला घालेल".
    स्वामी म्हणाले 'अरे दारात गायत्री असताना तू दुसरीकडे कशास जातोस?'
    ब्राम्हण म्हणाला "स्वामी अंगणात गाय आहे खरी. पण ती असून नसल्या सारखी.ती वांझ गाय आहे.तिला दुध कसे येईल".
    स्वामी गायी जवळ जाऊन म्हणाले. 'गे माझी माय.तुझा मालक कुटुंबवत्सल आहे. त्यास दुध देत जा'.
    असे म्हणून गायीच्या पाठीवरून हात फिरवला. ब्राम्हणास आज्ञा केली कि जा चवरी आण दुध काढून घे.
    ब्राम्हणाने विश्वासाने धार काढावयास घेतली.आणि चमत्कार झाला. जी गाय आज पर्यंत भाकड,वांझ म्हणून आपण पोसली त्या गायीने स्वामींच्या आज्ञेने चांगले दुध दिले. ब्राम्हण पत्नीने स्वामींना दशम्यांचा  प्रसाद करून वाढला.स्वामींनी दोघांना तुमच्या घरी अखंडलक्ष्मी नांदेल असा आशीर्वाद दिला.

    अशा रीतीने स्वामींच्या आज्ञेनुसार सर्व प्राणीमात्र,अखिल ब्रम्हांड वर्तते याची कल्पना आपणास येते.

    0

    एक टिप्पणी जोडा



  2. सुनील नांदगावकर, शुक्रवार, २२ जुलै २०११

    बालगणेश, बालहनुमान आणि रामायण यांसारख्या पौराणिक कथांवर प्रदर्शित झालेले अ‍ॅनिमेशनपट बच्चेकंपनीला तसेच मोठय़ांनाही आवडले होते. हॉलीवूडने तर डिजिटल तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यानंतर जगभरातील विविध भाषांमध्ये अ‍ॅनिमेशनपटांची निर्मिती केली आणि ते अ‍ॅनिमेशनपट प्रचंड लोकप्रियही ठरले. आता मराठीत प्रथमच अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थावर अ‍ॅनिमेशनपट तयार होत आहे.
    स्वामी समर्थ यांचे चरित्र, चमत्कार आणि त्यांची शिकवण याचे चित्रण या अ‍ॅनिमेशनपटात केले जाणार आहे.
    या अ‍ॅनिमेशनपटाची मूळ संकल्पना दिलीप प्रधान यांची असून दिग्दर्शनही तेच करणार आहेत. यासंदर्भात ते म्हणाले की, श्री स्वामी समर्थ हे आजानुबाहू होते. त्यामुळे त्यांच्यावर चित्रपट करताना त्यांची व्यक्तिरेखा साकारणारा कलावंत आजानुबाहू असावा असे मला वाटले. ते शक्य नसल्यामुळेच अ‍ॅनिमेशनपट करण्याची कल्पना मनात आली. त्याशिवाय अ‍ॅनिमेशनपट हे मुख्यत: बच्चेकंपनीला आवडतात. स्वामी समर्थाची शिकवण आणि त्यांनी समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून मांडलेले विचार हे अ‍ॅनिमेशनपटाच्या माध्यमातून बालप्रेक्षकांनी पाहिले तर त्यांच्यावर चांगले संस्कार होऊ शकतात या उद्देशानेच अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती करणार असल्याचेही प्रधान यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. अ‍ॅनिमेशनपटात आजच्या काळातील स्वामी समर्थाचा भक्त दाखविण्यात आला असून त्या भक्ताला विविध रूपांमध्ये स्वामी समर्थ मदत करतात असे दाखविण्याचे ठरविले आहे. सध्या या अ‍ॅनिमेशनपटासाठी आवश्यक ती चित्रे काढण्याचे काम सुरू असून साधारणपणे दीड ते दोन कोटी रुपयांमध्ये हा थ्रीडी अ‍ॅनिमेशनपट सुरुवातीला डीव्हीडीवर तयार केला जाणार आहे. त्यानंतर डीव्हीडी फॉरमॅटवरून मोठय़ा पडद्यावर दाखविण्यासाठी प्रक्रिया केली जाणार असल्याची माहितीही दिलीप प्रधान यांनी दिली. अ‍ॅनिमेटर अमोल जगताप हे अ‍ॅनिमेशन करणार असून चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांशी चर्चा केल्यानंतरच मराठीत अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती करण्याचे ठरविले, असे सांगून प्रधान म्हणाले की, स्वरूपआनंद भालवणकर यांनी यासाठी १२ गाणी तयार केली असून पोवाडे व गाण्यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ यांनी केलेले चमत्कार दाखविण्यात येतील. साधारणपणे डिसेंबर अखेपर्यंत अ‍ॅनिमेशनपट डीव्हीडीवर प्रकाशित केला जाणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे थ्रीडी अ‍ॅनिमेशनपटांची संख्या वाढत असून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार होणाऱ्या अ‍ॅनिमेशनपटांनाही सरकारने अनुदान द्यायला हवे.

    टीप :- सदर नोंदी मधील लेखन हे जसे च्या तसे 'वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर' या फेसबुक पृष्ठावरून घेण्यात आले आहे. त्यासाठी पृष्ठ व्यवस्थापकाचे आभार. सदर फेसबुक पृष्ठाची लिंक खाली जोडली आहे.
    https://www.facebook.com/photo.php?fbid=248581905241723&set=pb.207303642702883.-2207520000.1394866327.&type=3&theater
    0

    एक टिप्पणी जोडा




  3. ठाण्यातील लक्ष्मण कोळी आपल्या स्वजनांसहित अक्कलकोट ला श्रींच्या दर्शनास आला होता. श्रींवर त्याची खूप श्रद्धा जडली. पुढे एकदा मासेमारीच्या मोसमात तो त्याचे गलबत घेऊन मुंबईच्या किनार्यावर निघाला त्यावेळी नेमके वादळ घोंगावू लागले. वादळाने रुद्र अवतार धारण केला. लक्ष्मणाचे गलबत हेलकावे खाऊ लागले. परिणाम काय आहे हे गलबतावरच्या सर्व खलाशांना आणि लक्ष्मण कोळ्याला कळून चुकले.आता या संकटातून आपले कौशल्य, आज पर्यंत चा अनुभव कामी येत नाही असे लक्षात आल्यावर लक्ष्मणाने श्री स्वामी समर्थ माउली चा धावा सुरु केला.
    ''हे अक्कलकोट निवासिनी आई SSSSSSS लेकरं संकटात आहेत. धाव आई धाव. या आम्हा सर्वांची तारणहार तूच आहेस.''

    इकडे वटवृक्षा खाली विचित्र लीला घडत होती.

    स्वामी वडाखाली पलंगावर निजलेले असता. अचानक फटका मारल्या सारखा हवेत हात फिरवला. स्वामींच्या हातातून एकाएकी पाणी पडले.जमलेल्या भक्त गणांना आश्चर्य वाटले. आणि अजून एक अतर्क्य लीला अनुभवयास मिळणार अशा औत्सुक्याने काहींनी स्वामींना विचारले.
    स्वामी काय केलेत.आणि हे पाणी कसलं.
    स्वामी म्हणाले 'अरे जहाज बुडत होतं! ते बाहेर काढलं'
    काहींनी पाण्याची चव घेऊन पाहिली तर चव निव्वळ खारट लागली होती.कुणालाच समर्थांचा हा विचित्र खेळ समजला नव्हता.

    इकडे समुद्रात गलबताला एकाएकी जोरात हेलकावा मारून गलबत स्थिर झाले होते. वादळ शमले होते. वादळ शमू शकते या निसर्गाच्या खेळाचा अंदाज लक्ष्मण कोळ्याला होताच. पण एकाएकी धक्का बसून आपले गलबत बुडता बुडता स्थिर कसे झाले याचा काही उगम लक्ष्मण कोळ्याला झाला नाही.
    हि स्वामींचीच काही लीला होती हे मात्र कळून चुकले.

    लक्ष्मण कोळी मोठ्या आनंदाने स्वामींचे आभार मानत, गुणगान गात किनार्यावर आला.आणि लगेचच अक्कलकोट ला निघण्याची तयारी केली.लक्ष्मण कोळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत विलक्षण कृतज्ञतेने अक्कलकोटी स्वामींचे दर्शन घेण्यास आला. दर्शन घेतले आणि झाला प्रसंग सर्व भाविक भक्तांना सांगितला. तेव्हा १५ दिवसांपूर्वी स्वामींनी केलेल्या लीलेचा, खारट पाणी, अचानक पलंगावरून उठून हवेत मारलेला हात या सर्वांचा उगम सर्वांस झाला.दर्शन घेऊन लक्ष्मण कोळी मोठ्या आनंदाने ठाण्यास परतला आणि तिथे स्वामींचा मठ उभारून स्वामींची सेवा करू लागला.

    अशा अनेक कथा ज्यांमध्ये स्वामी माऊली आपल्या असंख्य लेकरांचे रक्षण कसे करते त्याचे दाखले आहेत. त्या आपण या ब्लॉग च्या माध्यमातून वाचणार आहोत.

    ||श्री स्वामी समर्थ||
    0

    एक टिप्पणी जोडा



  4. ||श्री स्वामी समर्थ||
    श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत 


    विष्णू बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत हा २१अध्यायी प्रासादिक पारायण ग्रंथ लिहिलाविष्णू बुवांचा जन्मरत्नागिरीतील पालशेत मध्ये झाला.व्यवसायाने ते शिक्षकहोते.पुढे कुणी शंकर शेट नावाच्या मारवाडी स्वामीभक्तस्नेह्यामुळे विष्णुबुवा सुद्धा स्वामी भक्ती करू लागलेआणिकोणतीही काव्य शक्ती नसताना त्यांनी स्वामीचरित्र सारामृतलिहिले.
    आज हा प्रासादिक ग्रंथ गेली कित्येक दशके लाखो घरातपुजला जातोभजला जातोअनेक भाविकआबालवृद्ध याग्रंथाचे प्रेमाने पारायण करून स्वामींची सेवा करतआहेतस्वामींनी त्यांना पाऊलो-पाऊली प्रचीती दिली आहेआणि देत राहतीलआणि भक्तवत्सल भक्ताभिमानी हेविशेषण अजून  दृढ करतील
    पारायण सुलभ पद्धतीने करता येते.रोज ,,,२१ अशाअंकामध्ये अध्याय वाचता येतातआजच्याधकाधकीच्या काळामध्ये एक अध्याय जरी वाचला,इतकी सेवासुद्धा स्वामींपर्यंत पोहोचली जातेओवीबद्ध रचनास्वामींच्यालीलांचे अद्भुत वर्णन यामुळे हा ग्रंथ वाचता वाचता भाविकतल्लीन होऊन जातात
    आपण सुद्धा या पवित्र ग्रंथाचे पारायण करून आपल्या याव्याप युक्त जीवनात समाधान आणूया आणि स्वामींची सेवाकरूया
    स्वामी हजार हातांनी देताहेतपण घेणार्याचे हात मात्र दोनआणि दिलेले साठवण्यासाठी मनाची खोली मात्र संकुचितआहे
    ।।श्री स्वामी समर्थ।।


    0

    एक टिप्पणी जोडा




  5. 1) श्री स्वामी समर्थ जप भजन



    2)'स्वामी समर्थ दत्तरुप'


    3)श्री स्वामी समर्थ आरती
    ऐकण्यासाठी येथे क्लिक करा


    4)श्री स्वामी समर्थ कथामृत 
    0

    एक टिप्पणी जोडा



  6. स्वामीसुतांचे आशीर्वचन
    ” श्रद्धा,सचोटी आणि अढळ स्वामी निष्ठा तुमच्या ठायी आहे तो वर सर्व बाजूंनी भरभराटच होइल हे निश्चित,अशक्य ही शक्य करतील स्वामी..” 


    – श्री स्वामी सूत.
    || भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||
    0

    एक टिप्पणी जोडा


























  7. टिप : स्वामीभक्तांपुढे शेयर करण्यासाठी सदर छायाचित्रे आंतरजालावरून मिळाली. या पोस्ट चे श्रेय मला नाही.

    0

    एक टिप्पणी जोडा



  8. अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज 

    श्री समर्थ सद्गुरू श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय.

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय.

    समर्थ अष्टक

    असे पातकी मी स्वामी राया,
    पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया.
    नसे अन्य त्राता जागी या दिनाला,
    समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला. 

    मला माय ना बाप ना आप्त बंधू 
    सखा सोयरा सर्वे तू दीनबंधू 
    तुझा मात्र आधार या लेकराला 
    समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला. 

    नसे शास्त्र विद्या कालादीपक काही
    नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथा ही.
    तुझे लेकरू ही अहंता मनाला 
    समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला.

    प्रपंची पुरा बद्ध झालो दयाला,
    तुझा दास मी ही स्मृती ना मनाला.
    क्षमेची असे याचना त्वत्पादाला,
    समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला.

    मला काम क्रोधाधीकी नागविले 
    म्हणोनी समर्था तुला जागविले.
    नको दूर लोटू तुझ्या सेवकाला,
    समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला. 

    नको अंत पाहू त्वरे धाव घेई 
    तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ट आई.
    अनाथासि आधार तुझा दयाला,
    समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला. 

    कधी गोड वाणी न येई मुखाला,
    कधी द्रव्य न अर्पिले याचकाला.
    कधी मूर्ती तुझी न ये लोचानाला,
    समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला. 

    मला एवढी घाल भिक्षा समर्था, 
    मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा. 
    घडो पाद सेवा तुझ्या किंकराला,
    समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला.
    0

    एक टिप्पणी जोडा



  9. । श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय ।


    ॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥ श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।भावातीतं त्रिगुणरहितं सद़्गुरुं तं नमामि ॥जयजय श्री जगरक्षका । जयजयाजी भक्तपालका । जयजय कलिमलनाशका । अनादिसिद्धा जगद्गुरु ॥१॥ जयजय क्षीरसागर विलासा । मायाचक्रचालका अविनाशा । शेषशयना अनंतवेषा । अनामातीता अनंता ॥२॥ जयजयाजी गरुडवाहना । जयजयाजी कमललोचना । जयजयाची पतितपावना । रमारमणा विश्वेशा ॥३॥ मेघवर्ण आकार शांत । मस्तकी किरीट विराजित । तोच स्वयंभू आदित्य । तेज वर्णिले न जाय ॥४॥ विशाळ भाळ आकर्ण नयन । सरळ नासिका सुहास्य वदन । दंतपंक्ति कुंदकळ्यांसमान । शुभ्रवर्ण विराजती ॥५॥ रत्नमाला हृदयावरी । जे कोटी सूर्यांचे ते हरी । हेममय भूषणे साजिरी । कौस्तुभमणि विशेष ॥६॥ वत्सलांच्छनाचे भूषण । चेति प्रेमळ भक्तिची खूण । उदरी त्रिवळी शोभायमान । त्रिवेणीसंगमासारखी ॥७॥ नाभिकमल सुंदर अति । जेथे विधात्याची उत्पत्ती । की चराचरा जन्मदाती । मूळ चननी तेचि पै ॥८॥ जानूपर्यंत कर शोभति । मनगटी कंकणे विराजती । करकमलांची आकृति । रक्तपंकजासमान ॥९॥ भक्ता द्यावया अभय वर । सिद्ध सर्वदा सव्य कर । गदा पद्म शंख चक्र । चार हस्ती आयुधे ॥१०॥ कांसे कसिला पीतांबर । विद्युल्लतेसम तेज अपार । कर्दळीस्तंभापरी सुंदर । उभय जंघा दिसताती ॥११॥ जेथे भक्तजन सुखावती । ज्याच्या दर्शने पतीत तरती । ज्याते अहोरात्र ध्याती । नारदादि ऋषिवर्य ॥१२॥ ज्याते कमला करे चुरीत । संध्यारागा समान रक्त । तळवे योग्य चिन्हे मंडित । वर्णित वेद शीणले ॥१३॥ चौदा विद्या चौसष्ट कला । ज्याते वर्णित थकल्या सकळा । ऐशा त्या परम मंगला । अल्पमती केवि वर्णू ॥१४॥ नारदादि मुनीश्वर । व्यास वाल्मिकादि कविवर । लिहू न शकले महिमांवर । तेथे पामर मी काय ॥१५॥ जो सकळ विश्वाचा जनिता । समुद्रकन्या ज्याची कांता । जो सर्व कारण कर्ता । ग्रंथारंभी नमू तया ॥१६॥ त्या महाविष्णूचा अवतार । गजवदन शिवकुमार । एकदंत फरशधर । अगम्य लीला जयांची ॥१७॥ जो सकळ विद्यांचा सागर । चौसष्ट कलांचे माहेर । रिद्धि सिद्धीचा दातार । भक्त पालक दयाळू ॥१८॥ मंगल कार्या करिता स्मरण । विघ्नें जाती निरसोन । भजका होई दिव्य ज्ञान । वेदांतसार कळे पां ॥१९॥ सकल कार्यारंभी जाणा । करिती ज्याच्या नामस्मरण । ज्याच्या वरप्रसादे नाना । ग्रंथरचना करिती कवी ॥२०॥ तया मंगलासी साष्टांग नमन । करूनी मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । निर्विघ्नपणे होवो हे ॥२१॥ जिचा वरप्रसाद मिळता । मूढ पंडित होती तत्त्वता । सकळ काव्यार्थ येत हाता । ती ब्रह्मसुता नमियेली ॥२२॥ मूढमती ती अज्ञान । काव्यादिकांचे नसे ज्ञान । माते तू प्रसन्न होवोन । ग्रंथरचना करवावी ॥२३॥ जो अज्ञानतिमिरनाशक । अविद्याकाननच्छेदक । जो सद़्बुद्धीचा प्रकाशक । विद्यादायक गुरुवर्य ॥२४॥ ज्याचिया कृपेकरोन । सच्छिष्या लाधे दिव्यज्ञान । तेणेच जगी मानवपण । येतसे की निश्चये ॥२५॥ तेवी असता मातापितर । तैसेचि श्रेष्ठ गुरुवर्य । चरणी त्यांचिया नमस्कार । वारंवार साष्टांग ॥२६॥ मी मतिमंद अज्ञ बाळ । घेतली असे थोर आळ । ती पुरविणार दयाळ । सद़्गुरुराज आपणची ॥२७॥ नवमास उदरी पाळिले । प्रसववेदनांते सोशिले । कौतुके करूनी वाढविले । रक्षियेले आजवरी ॥२८॥ जननीजनका समान । अन्य दैवत आहे कोण । वारंवार साष्टांग नमन । चरणी तयांच्या करीतसे ॥२९॥ ब्रम्हा विष्णू महेश्वर । तिन्ही देवांचा अवतार । लीलाविग्रही अत्रिकुमार । दत्तात्रेय नमियेला ॥३०॥ तीन मुखे सहा हात । गळा पुष्पमाळा शोभत । कर्णी कुंडले तेज अमित । विद्युल्लतेसमान ॥३१॥ कामधेनू असोनि जवळी । हाती धरिली असे झोळी । जो पहाता एका स्थळी । कोणासही दिसेना ॥३२॥ चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ॥३३॥ त्या परब्रम्हासी नमन । करोनि मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । होवो कृपेने आपुल्या ॥३४॥ वाढला कलीचा प्रताप । करू लागले लोक पाप । पावली भूमि संताप । धर्मभ्रष्ट लोक बहू ॥३५॥ पहा कैसे दैव विचित्र । आर्यावर्ती आर्यपुत्र । वैभवहीन झाले अपार । दारिद्र्य, दुःखे भोगिती ॥३६॥ शिथिल झाली धर्मबंधने । नास्तिक न मानिती वेदवचने । दिवसेंदिवस होमहवने । कमी होऊ लागली ॥३७॥ सुटला धर्माचा राजाश्रय । अधर्मप्रवर्तका नाही भय । उत्तरोत्तर नास्तिकमय । भरतखंड जाहले ॥३८॥ नाना विद्या कला । अस्तालागी गेल्या सकला । ऐहिक भोगेच्छा बळावल्या । तेणे सुटला परमार्थ ॥३९॥ धर्मसंस्थापनाकारणे । युगायुगी अवतार घेणे । नानाविध वेष नटणे । जगत्पतीचे कर्तव्य ॥४०॥ लोक बहु भ्रष्ट झाले । स्वधर्माते विसरले । नास्तिकमतवादी मातले । आर्यधर्माविरुद्ध ॥४१॥ मग घेतसे अवतार । प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार । अक्कलकोटी साचार । प्रसिद्ध झाला स्वामीरुपे ॥४२॥ कोठे आणि कोणत्या काळी । कोण्या जातीत कोणत्या कुळी । कोण वर्णाश्रम धर्म मुळी । कोणासही कळेना ॥४३॥ ते स्वामी नामे महासिद्ध । अक्कलकोटी झाले प्रसिद्ध । चमत्कार दाविले नानाविध । भक्त मनोरथ पुरविले ॥४४॥ त्यांसी साष्टांग नमोनी । करी प्रार्थना कर जोडोनी । आपुला विख्यात महिमा जनी । गावयाचे योजिले ॥४५॥ तुमचे चरित्र महासागर । पावेन कैसा पैलतीर । परि आत्मसार्थक करावया साचार । मीन तेथे जाहलो ॥४६॥ किंवा अफाट गगनासमान । अगाध आपुले महिमान । अल्पमती मी अज्ञान । आक्रमण केवी करू ॥४७॥ पिपीलिक म्हणे गिरीसी । उचलून घालीन काखेसी । किंवा खद्योत सूर्यासी । लोपवीन म्हणे स्वतेजे ॥४८॥ तैसी असे माझी आळ । बाळ जाणूनी लडिवाळ । पुरविता तु दयाळ । दीनबंधू यतिवर्या ॥४९॥ कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥५०॥ ऐसी ऐकुनिया स्तुती । संतोषली स्वामीराजमूर्ति । कविलागी अभय देती । वरदहस्ते करोनी ॥५१॥ उणे न पडे ग्रंथांत । सफल होतील मनोरथ । पाहूनी आर्यजन समस्त । संतोषतील निश्चये ॥५२॥ ऐसी ऐकोनि अभयवाणी । संतोष झाला माझिया मनी । यशस्वी होवोनी लेखणी । ग्रंथसमाप्तीप्रति होवो ॥५३॥ आतां नमू साधुवृंद । ज्यासी नाही भेदाभेद । ते स्वात्मसुखी आनंदमय । सदोदित राहती ॥५४॥ मग नमिले कविश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर । ज्यांची काव्ये सर्वत्र । प्रसिद्ध असती या लोकी ॥५५॥ व्यास वाल्मिक महाज्ञानी । बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी । वारंवार तयांच्या चरणी । नमन माझे साष्टांग ॥५६॥ कविकुलमुकुटावतंस । नमिले कवि कालिदास । ज्यांची नाट्यरचना विशेष । प्रिय जगी जाहली ॥५७॥ श्रीधर आणि वामन । ज्यांची ग्रंथरचना पाहोन । ज्ञातेही डोलविती मान । तयांचे चरण नमियेले ॥५८॥ ईशचरणी जडले चित्त । ऐसे तुकारामादिक भक्त । ग्रंथारंभी तया नमित । वरप्रसादाकारणे ॥५९॥ अहो तुम्ही संत जनी । मज दीनावरी कृपा करोनी । आपण हृदयस्थ राहोनी । ग्रंथरचना करवावी ॥६०॥ आता करू नमन । जे का श्रोते विलक्षण । महाज्ञानी आणि विद्वान । श्रवणी सादर बैसले ॥६१॥ महापंडित आणि चतुर । ऐसा श्रोतृसमाज थोर । मतिमंद मी त्यांच्यासमोर । आपले कवित्व केवी आणू ॥६२॥ परी थोरांचे लक्षण । एक मला ठाउके पूर्ण । काही असता सद्गुण । आदर करिती तयाचा ॥६३॥ संस्कृताचा नसे गंध । मराठीही न ये शुद्ध । नाही पढलो शास्त्रछंद । कवित्वशक्ती अंगी नसे ॥६४॥ परी हे अमृत जाणोनी । आदर धरावा जी श्रवणी । असे माझी असंस्कृत वाणी । तियेकडे न पहावे ॥६५॥ न पाहता जी अवगुण । ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण । एवढी विनंती कर जोडोनी । चरणी आपुल्या करीतसे ॥६६॥ स्वामींच्या लीला बहुत । असती प्रसिद्ध लोकांत । त्या सर्व वर्णिता ग्रंथ । पसरेल समुद्रसा ॥६७॥ त्या महोदधीतुनी पाही । अमोल मुक्ताफळे घेतली काही । द्यावया मान सूज्ञाही । अवमान काही न करावा ॥६८॥ की हे उद्यान विस्तीर्ण । तयामाजी प्रवेश करोन । सुंदर कुसुमे निवडोन । हार त्यांचा गुंफिला ॥६९॥ कवि होवोनिया माळी । घाली श्रोत्यांच्या गळी । उभा ठाकोनि बद्धांजुळी । करी प्रार्थना सप्रेमे ॥७०॥ अहो या पुष्पांचा सुवास । तृप्त करील आपुले मानस । हा सुगंध नावडे जयास । तेचि पूर्ण अभागी ॥७१॥ आता असोत हे बोल । पुढे कथा बहु अमोल । वदविता स्वामी दयाळ । निमित्त मात्र विष्णुकवि ॥७२॥ वैराग्य प्रत्यक्ष शंकर । तेजे कैसा सहस्त्रकर । दुष्टां केवळ सूर्यपुत्र । भक्तां मातेसमान ॥७३॥ यतिराजपदकल्हार । विष्णुकवि होऊनी भ्रमर । ज्ञानमधुस्तव साचार । रुंची तेथे घालीतसे ॥७४॥ इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आदरे भक्त परिसोत । प्रथमोऽध्याय गोड हा ॥७५॥॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥


    0

    एक टिप्पणी जोडा



  10. श्री गणेशाय नमः! श्री सरस्वत्यै नमः! श्री गुरुभ्यो नमः! श्री कुलदेवतायै नमः!
    श्री अक्कलकोटनिवासी-पुर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामीराजाय नमः!!
    ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमुर्तिम्‌! द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्‌‍! एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं! भावातीतं त्रिगुणरहितं सद्‌गुरुं तं नमामि!!
    ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथा- टोपी- च माला कमण्डलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामीसमर्थावतारधारक पाहि माम्‌! पाहि माम्‌!
    आता करुया प्रार्थना! जयजयाजी अघहरणा! परात्परा कैवल्यसदना! ब्रह्मानंदा यतिवर्या! जयजयाजी पुराणपुरुषा! लोकपाला सर्वेशा! अनंत ब्रह्मांडधीशा! देववंद्या जगद्गुरु!! सुखधामनिवासिया! सर्वसाक्षी करुणालया! भक्तजन ताराया! अनंतरुपे नटलासी! तू अग्नी तू पवन! तू आकाश तू जीवन! तूची वसुंधरा पुर्ण! चंद्र सूर्य तूच पै! तू विष्णु आणि शंकर! तू विधाता तू इंद्र! अष्टदिक्‌पालादि समग्र! तूच रुपे नटलासी! कर्ता आणि करविता! तूच हवी आणि होता! दाता आणि देवविता! तूच समर्था निश्चये! जंगम आणि स्थिर! तूच व्यापिले समग्र! तुजलागी आदिमध्याग्र! कोठे नसे पाहतां! असोनिया निर्गुण! रुपे नटलासी सगुण! ज्ञाता आणि ज्ञान! तूच एक विश्वेशा! वेदांचाही तर्क चाचरे! शास्त्रातेही नावरे! विष्णु शंकर एकसरे! कुंठित झाले सर्वही! मी केवळ अल्पमती! करु केवी आपुली स्तुती! सहस्रमुखी निश्चिती! शिणला ख्याती वर्णितां! दॄढ ठेविला चरणी माथा! रक्षावे मजसी समर्था! कृपाकटाक्षे दीनानाथा! दासाकडे पाहावे! आता इतुकी प्रार्थना! आणावी जी आपुल्या मना! कृपासमुद्री या मीना! आश्रयदेईजे सदैव! पाप ताप आणि दैन्य! सर्व जावो निरसोन! इष्टलोकी सौख्यदेवोन! परलोकसाधन करवावे! दुस्तर हा भवसागर! याचे पावावया पैलतीर! त्वन्नाम तरणी साचार! प्राप्त होवो मजला ते! आशा मनीषा तृष्णा! कल्पना आणि वासना! भ्रांती भुली नाना! न बाधोत तुझ्या कृपे! किती वर्णु आपुले गुण! द्यावे मज सुख साधन! अज्ञान तिमिर निरसोन! ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै! शांती मनी सदा वसो! वृथाभिमान नसो! सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी! भवदुःखे हे निसरो! तुझ्या भजनी चित्त वसो! वृथा विषयांची नसो! वासना या मनाते! सदा साधु समागम! तुझे भजन उत्तम! तेणे होवो हा सुगम! दुर्गम जो भवपंथ! व्यवहारी वर्तता! न पडो भ्रांती चित्ता! अंगी न यावी असत्यता! सत्ये विजयी सर्वदा! आप्तवर्गाचे पोषण! न्यायमार्गावलंबन! इतुके द्यावे वरदान! कृपा करुनि समर्था! असोनिया संसारात! प्राशीन तव नामामृत! प्रपंच आणि परमार्थ! तेणे सुगम मजलागी! कर्ता आणि करविता! तूची एक स्वामीनाथा! माझिया ठाई वार्ता! मीपणाची नसेची!!
    "गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः! गुरुः साक्षात्‌ परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः!!"
    !!श्री स्वामी समर्थार्पणमस्तु!!
    0

    एक टिप्पणी जोडा



लोड करत आहे

No comments: