Ameya

Wednesday 25 September 2019

56 Ganesh

यात्रा छप्पन्न काशी विनायकांची..

<span style="color: #ff0000;">गणेश विशेष </span><br /> ‘काशीस जावे,नित्य वदावे’ असं वचन आपल्याकडे आहे.

 ‘काशीस जावे,नित्य वदावे’ असं  वचन आपल्याकडे आहे. काशीला जाणं जमत नसेल तर निदान सारखं जायचंय, जायचंय असं सतत म्हणत तरी राहा असा त्याचा अर्थ. इतकं काशी या क्षेत्राला हिंदू धर्मात महत्त्व आहे. अशा या काशी क्षेत्री गेल्यानंतर वेगवेगळ्या यात्रा केल्या जातात. त्यातली एक प्रसिद्ध छप्पन्न विनायकांची यात्रा. नेमकी काय आहे ही यात्रा?
वेद आणि काशी हे दोन्ही अपौरुषेय आहेत असे मानले जाते. प्राणी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काशीक्षेत्र त्याला मान, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, अन्न-पाणी, आसरा, भक्ती, ज्ञान देत राहील आणि अंत:समयी त्याला मोक्ष प्राप्त करून देईल, असे म्हटले जाते. काशीक्षेत्राचे महत्त्व सांगणारे असे अनेक प्राचीन व अर्वाचीन ग्रंथ आहेत. वेद, महाभारत, सर्व पुराणे, काशीखंड, काशीरहस्य अशा अनेक ग्रंथांतून काशीक्षेत्राची महती सांगितली आहे. असे म्हणतात की भगवान विष्णूंनी काशीची महती सांगताना काशीची तीन नावे सांगितली आहेत. काशी ही मोक्ष देणारी म्हणून ती ‘मोक्षदा’ आहे. ती धर्म देणारी म्हणून ‘धर्मदा’ आहे आणि अर्थ देणारी म्हणून ‘अर्थदा’ आहे.  कामार्थ्यांसाठी ‘कामद’ कल्पवल्ली असेही तिला म्हटले जाते. काशीयात्रा करणाऱ्यांना कालभैरव, ढुंढिराज, अन्नपूर्णा, काशीविश्वेश्वर, बिंदुमाधव, विष्णू असे अनेक देव प्रसन्न होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करतात, असे मानले जाते. काशी तीर्थक्षेत्री मरण आलेल्या व्यक्तीला पुनर्जन्म प्राप्त होत नाही आणि त्याला कायमची मोक्षप्राप्ती होते अशी भक्तांची धारणा आहे. अशा या काशीक्षेत्री अनेक देवतांची देवळे आहेत. त्यामध्ये सर्वश्रेष्ठ गंगेच्या किनारी असलेले काशीविश्वेश्वराचे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र आहे. प्राचीन काळापासून ते एक संस्कृत अध्ययनाचे एक महत्त्वाचे पीठ मानले जाते. या तीर्थक्षेत्री येऊन अनेक भक्त वेगवेगळय़ा प्रकारच्या यात्रा करीत असतात. त्यामध्ये काशीपंचक्रोशी यात्रा ही अत्यंत प्रसिद्ध यात्रा आहे. तसेच काशीतील छप्पन्न विनायकांची यात्रा, रुद्रभैरवयात्रा, नवग्रहयात्रा, अष्टभैरवयात्रा, नवदुर्गायात्रा, सप्तपुरीयात्रा, सूर्यमंदिरयात्रा भाविक आवर्जून करतात. ‘ब्रह्मणस्पतिविश्व’ या गणेश ग्रंथमालेच्या प्रकाशनाच्या निमित्ताने वरील यात्रांपैकी छप्पन्न विनायकांची यात्रा मी केली. खरेतर काशीची ‘छप्पन्न विनायकांची यात्रा’ फार पूर्वीपासून गणेशभक्त करीत असत. ढुंढिराज हे काशीतील प्रधान गणेशपीठ आहे. काशीविश्वेश्वराचे रक्षण करण्याच्या हेतूने ढुंढिराजाने काशीविश्वेश्वराच्या भोवताली सात आवरणांमध्ये प्रत्येकी आठ अशा छप्पन्न विनायकांची स्थापना केली आहे. स्कंदमहापुराणांतर्गत ५७व्या अध्यायात या छप्पन्न विनायकांचे माहात्म्य सांगितले आहे.
षट्पञ्चाशद् गजमुखानेतान् य: संस्मरिष्यति।
दूरदेशान्तरस्थोऽपि स मृतो ज्ञानमाप्नुयात्।।
इमे गणेश्वरा: सर्वे स्मर्तव्या यत्र कुत्रचित्।
महाविषत्समुद्रान्त: पतन्तं पान्ति मानवम्।।
अर्थ- या छप्पन्न गणेशांचे जो स्मरण करेल, तो दूरदेशी असला तरी मृत्युशय्येवर पडलेला असला तरी त्याला ज्ञान प्राप्त होईल. जिथे कुठे असतील तिथे सर्वानी या गणेशांचे स्मरण करावे. ते सर्व गणेश संकटांच्या समुद्रात बुडालेल्या मानवाचंदेखील रक्षण करतील.
छप्पन्न विनायकांची यात्रा
आपल्या महाराष्ट्रात अष्टविनायकांची यात्रा करण्याची प्रथा आहे. (या अंकात पुढे महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रेची सद्यस्थिती सांगणारा एक शोधलेख आहे.) हे अष्टविनायक वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचे मानले जातात, तसेच काशीतील हे छपन्न विनायक त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्टय़ांसाठी प्रसिद्ध आहेत. मी या छप्पन्न विनायकांची यात्रा केली. त्यात विनायकदर्शन तर झालेच पण काशीतील सद्यस्थितीचे दर्शनही मला घडले. त्याचबरोबर देवळं, माणसं, सद्यकाळ यांच्याबद्दलच्या वस्तुस्थितीने मला अंतर्मुख केले. एकेकाळी त्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या असलेल्या या छप्पन्न विनायकांच्या आजच्या वस्तुस्थितीबद्दल समजून घेण्याआधी आपण या छप्पन्न विनायकांची त्यांच्या आवरणांसहित माहिती करून घेऊ.
प्रथम आवरण- प्रथम आवरणातील सर्व विनायक अभक्तांचे उच्चाटन व भक्तांचे सतत संरक्षण करतात, अशी धारणा आहे.
१) अर्क विनायक : असि आणि गंगा या दोन नद्यांच्या संगमावर हा अर्कगणेश विराजमान आहे. विश्वेश्वराच्या सात आवरणांतील गणपतींमध्ये प्रथम आवरणातील आग्नेय दिशेकडील ही मूर्ती आहे. रविवारच्या दिवशी याचे दर्शन घेतल्याने समस्त तापांची शांती होते, असे मानले जाते.
२) दुर्ग विनायक : काशीतील दुर्गाकुंडावर प्रथम आवरणात दक्षिण दिशेस ही मूर्ती स्थित असून सर्व दुर्गतींपासून हा गणेशभक्तांचे रक्षण करतो, अशी समजूत आहे.
३) भीमचण्ड विनायक : पंचक्रोशी यात्रेतील दुसऱ्या मुक्कामी भीमचण्डी देवीजवळ नैर्ऋत्य दिशेकडे ही मूर्ती आहे. याच्या दर्शनाने महाभय दूर होते असे भक्त मानतात.
४) देहली विनायक : देहली म्हणजे उंबरठा. पंचक्रोशी यात्रेतील तिसरा मुक्काम रामेश्वर येथे जाणाऱ्या मार्गावर मटौली गावाच्या पुढे, काशीच्या पश्चिम दिशेकडे हे विनायक स्थान आहे. देहली विनायकाचे मंदिर अतिशय पुरातन असून मंदिराच्या कक्षेमध्ये ११ फूट लांब, ११ फूट रुंद असा एक जुना शिलालेख आढळतो. ही गणेशमूर्ती मूषकावर आसनस्थ असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या एका हातात शस्त्र, दुसऱ्या हातात माला, तिसऱ्या हातात फळ आणि चौथ्या हातात लाडू आहे. पंचक्रोशीच्या यात्रेच्या वेळी गणेशभक्त या विनायकाला लाहय़ा, ऊस आणि सातू वाहतात. भगवान शंकराने देहली विनायकाला द्वारपालरूपात काशीतीर्थाच्या पश्चिम भागाचे संरक्षण करण्याचा आदेश दिला अशी दंतकथा प्रसिद्ध आहे.
५) उद्दण्ड विनायक : पंचक्रोशी मार्गावरील तिसऱ्या रामेश्वर मुक्कामाजवळ मोइनी गावात वायव्य दिशेकडे हे स्थान आहे. गणेशभक्तांच्या मार्गात येणाऱ्या उद्दण्ड विघ्न प्रवाहास हा दंडित करतो, असे मानतात. नेहमी बलाढय़ संकटांना दंड देणारा म्हणून या विनायकाची ख्याती आहे. या विनायकाची मूर्ती ४ फुटी असून थोडी अस्पष्ट स्वरूपात आहे. तसेच मूर्ती पद्मासनात बसल्यासारखी दिसते.
६) पाशपाणि विनायक : पंचक्रोशी मार्गावर रेल्वेलाइनजवळ उत्तर दिशेस हे देऊळ आहे. काशिवास करणाऱ्या लोकांच्या सर्व विघ्नांना हा पाशाने बांधून ठेवतो, असा समज आहे.
७) खर्व विनायक : गंगा आणि वरुणा या नद्यांच्या संगमस्थळी आदिकेशव देवळाजवळ, पंचक्रोशी मार्गावर ईशान्य दिशेकडे हे देऊळ आहे. सज्जनांची मोठमोठी संकटे दाबून ती तो छोटी करतो, असे माले जाते. (खर्व म्हणजे लहान, वामन.)
८) सिद्धिविनायक- पूर्व दिशेकडे मणिकर्णिका घाटावर यमतीर्थाच्या पश्चिमेकडे हे स्थान आहे. काशीक्षेत्राचे रक्षण करणारा, साधकांना शीघ्र फल देणारा असा हा विनायक आहे, असा समज आहे.
द्वितीय आवरण- द्वितीय आवरणातील हे सर्व विनायक विघ्नांचा प्रवाह दूर करून काशिवास सुखमय करून देतात, असे समजले जाते.)
९) लंबोदर (गणाध्यक्ष) विनायक- द्वितीय आवरणातील हा विनायक गंगेच्या पश्चिमकाठी अर्क विनायकापासून उत्तर दिशेकडे ललिता घाटाकडे स्थित आहे. हा विघ्नरूपी मलाचे क्षालन करतो, असे मानण्याची प्रथा आहे.
१०) कूटदन्त विनायक- दुर्ग विनायकाच्या उत्तरेकडे अघोरयोगी संत बाबा किनाराम यांच्या स्थानाजवळ कुंडाजवळ स्थित आहे. हा गणेशभक्तांची विघ्ने दूर करून त्यांचे रक्षण करतो, असा गणेशभक्तांचा विश्वास आहे.
११) शालकटड्-कट- विनायक- भीमचंडीपासून थोडय़ा दूर ईशान्य दिशेला मरुवक (मडवाडीह) बाजार येथे तळय़ावर हा गणपती स्थित आहे. हा पवित्र काशीक्षेत्राचे सतत रक्षण करतो, असे सांगितले जाते. (शाल वृक्षावर राहणाऱ्या दोन दैत्यांचा वध येथे झाला.)
१२) कुष्माण्ड विनायक- (कुष्माण्ड म्हणजे कोहळा.) देहली विनायकापासून पूर्व दिशेकडे फुलवारिया गावात स्थित आहे. हा विनायक मोठमोठाले उत्पात शांत करतो, असे मानले जाते.
१३) मुण्ड विनायक- उद्दण्ड विनायकापासून आग्नेय दिशेकडे त्रिलोचनेश्वर मंदिरात, वाराणसी देवीजवळ हे मंदिर आहे. या विनायकाचा देह पाताळात असून फक्त मुण्ड म्हणजे मस्तक हेच काशीत दिसते. म्हणून याला मुण्ड विनायक म्हणतात. हाही काशिवासीयांची विघ्ने दूर करीत असतो, असा समज आहे.
१४) विकटदन्तगणेश- पाशपाणि विनायकापासून दक्षिणेकडे धुमावती (धूमचण्डीदेवीनजीक) तळय़ावर स्थित आहे. या विनायकाच्या आराधनेमुळे गाणपत्यपद लाभते, असा भक्तांचा विश्वास आहे.
१५) राजपुत्र विनायक- खर्व विनायकापासून नैर्ऋत्य दिशेकडे वरुणाकाठी किल्ल्यात हे देऊळ आहे. याची आराधना केल्यास राज्यप्राप्ती होते आणि न केल्यास हा राज्यच्यूत करतो, असा याचा महिमा सांगितला जातो.
१६) प्रणव विनायक- गंगेच्या पश्चिमतीरी त्रिलोचन घाटावरील हिरण्यगर्भेश्वर देवळात हा स्थित आहे. हा विनायक भक्तांना स्वर्गसुख मिळवून देतो, अशी याची ख्याती आहे.
तृतीय आवरण- काशीक्षेत्रातल्या तिसऱ्या आवरणातील हे विनायक विघ्नांचा नाश करून रक्षक म्हणून काम करतात, असे भक्त मानतात.
१७) वक्रतुण्ड (सरस्वती) विनायक- गंगेकाठी लंबोदर विनायकापासून उत्तर दिशेकडे ६४ योगिनी घाटाच्या शेजारी राणामल घाटावर हे मंदिर आहे. हा विनायक पापसंघाचे हरण करतो, असा समज आहे.
१८) एकदन्त विनायक- कूटदन्त विनायकापासून उत्तर दिशेकडे बंगाली टोला या जागी पुष्पदन्तेश्वर मंदिरात स्थित आहे. उपसर्गापासून (विघ्नांपासून) सदैव आनंदकाननाचे (काशीचे) रक्षण करतो, असे मानले जाते.
१९) त्रिमुख विनायक- शालकटड्कट विनायकापासून ईशान्य दिशेकडे कामाक्षा मोहल्ला, सिगरा (शिवगिरी) स्थित रामकुंड सरोवराजवळ हे मंदिर आहे. या विनायकाचे वैशिष्टय़ म्हणजे वानर, सिंह व हत्ती यांची मुखे असलेला हा विनायक आहे. हा काशीचे नित्य भय दूर करीत असतो, असे सांगितले जाते.
२०) पञ्चास्य विनायक- पंचमुखी विनायक, कुष्माण्ड विनायकापासून पूर्व दिशेकडे पिशाचमोचन कुंडावर स्थित आहे. सिंहरथावर आरूढ असलेला हा विनायक काशीनगरीचे सतत रक्षण करीत असतो, असा समज आहे. पञ्चास्य विनायकाची मूर्ती २।। ते ३ फूट उंच असून ती चतुर्भुज आहे. त्याच्या दोन हातांमध्ये अनुक्रमे त्रिशूल आणि शस्त्र आहे. दोन हात मांडीवर आहेत.
२१) हेरंब विनायक- मुण्ड विनायकापासून आग्नेय दिशेस वाल्मीकीटिला स्थानावर स्थित आहे. हा विनायक आईप्रमाणे काशीवासीयांची इच्छा पूर्ण करतो, अशी याची ख्याती आहे. मूर्ती १ फूट उंचीची असून बसलेली आहे.
२२) विघ्नराज विनायक- विकटदन्त विनायकापासून पश्चिम दिशेस चित्रकूट तळय़ावर हा गणपती आहे. समस्त विघ्ननिवारणार्थ व सिद्धिप्राप्त्यर्थ याची आराधना केली जाते.
२३) वरद विनायक- राजपुत्र विनायकापासून नैर्ऋत्य दिशेकडे स्थित आहे. भक्तांना अभीष्ट वर देतो, असा समज आहे.
२४) मोदकप्रिय विनायक- प्रणव विनायकापासून दक्षिण दिशेकडे गंगेकाठी आदिमहादेव देवळात त्रिलोचनाजवळ पिंगलातीर्थावर हे स्थान आहे. याची आराधना केल्यास तो भक्तविघ्ननिवारण करतो, असे मानले जाते.
चतुर्थ आवरण- या आवरणातील विनायक काशीक्षेत्रातील भक्त लोकांचे विघ्न नष्ट करतात, असा समज रूढ आहे.)
२५) अभयप्रद विनायक- वक्रतुण्ड विनायकापासून उत्तर दिशेस दशाश्वमेधघाटाच्या उत्तरेकडे शूलटङेश्वर  महादेवाच्या देवळात स्थित आहे. हा विनायक सर्वाचे भय दूर करतो, असे गणेशभक्त मानतात.
२६) सिंहतुण्ड विनायक- एकदन्त विनायकापासून उत्तर दिशेस ब्रrोश्वर देवळात दशाश्वमेध स्थानापासून दक्षिणेस बालमुकुंद चव्हाटय़ावर स्थित आहे. काशिवास करणाऱ्या लोकांच्या जीवनात येणाऱ्या विघ्नरूपी हत्तीस ठार मारणारा म्हणून हा प्रसिद्ध आहे, असे सांगितले जाते.
२७) कूणिताक्ष विनायक- त्रिमुखविनायकाच्या ईशान्य दिशेस लक्ष्मीकुंडावर स्थित आहे. दुष्टांच्या कुदृष्टीपासून महाश्मशान काशीचे रक्षण करतो, असा समज आहे.
२८) क्षिप्रप्रसादन विनायक- क्षिप्र- त्वरित. पंचमुख विनायकापासून पूर्व दिशेकडे पितृकुंडावर स्थित आहे. याच्या पूजनाने त्वरित सिद्धिलाभ होतो, असे मानले जाते.
२९) चिंतामणी विनायक– हेरंब विनायकापासून दक्षिण दिशेस ईश्वरगंगीस्थित बाबूबाजार येथे स्थित आहे. याच्या उपासनेने चिंतितार्थ प्राप्त होत असतो, असे म्हणतात.
३०) दन्तहस्त विनायक- विघ्नराज विनायकापासून दक्षिण दिशेस मोठय़ा गणपती (बडागणेश) मंदिरात स्थित आहे. तो काशीशी द्रोह करणाऱ्यांच्या जीवनात हजारो विघ्ने उपस्थित करतो, असा समज आहे. दन्तहस्त विनायकाला दहा हात असून त्यातील एक हात मुखाजवळ नेलेला असल्यामुळे तो काही खात असल्याप्रमाणे दिसते. तसेच विनायकाने एका हाताच्या आधाराने लक्ष्मीला धारण केलेले आहे. तसेच डाव्या, उजव्या हाताला सिद्धी-बुद्धीच्या मूर्ती आहेत.
३१) पिचिण्डिल विनायक– (पिचिण्डिल म्हणजे ढेरपोटय़ा) वरद विनायकापासून नैर्ऋत्य दिशेस प्रल्हादघाटावर विराजमान आहे. हा विनायक काशिवासीयांचे दानवांपासून अहर्निश रक्षण करतो, असे सांगितले जाते.
३२) उद्दण्डमुण्ड विनायक- मोदकप्रिय विनायकापासून दक्षिण दिशेस त्रिलोचनात पिलपिलातीर्थ वारणसीदेवीच्या देवळात स्थित आहे. आराधक भक्तांना हा सर्व काही देतो, अशी याची ख्याती सांगितली जाते.
पञ्चम आवरण- यातील विनायक क्षेत्ररक्षण करीत असतात, असा समज आहे.
३३) स्थूलदन्त विनायक- अभयप्रद विनायकापासून उत्तर दिशेकडे गंगेकाठी मानमंदिर घाटाजवळ सोमेश्वर देवळाच्या द्वारदेशी स्थित आहे. याच्या आराधनेने सज्जनांना स्थूलसिद्धींची प्राप्ती होत असते, असे मानले जाते.
 ३४) कलिप्रियविनायक- सिंहतुण्ड विनायकापासून उत्तर दिशेकडे साक्षी विनायक मंदिरात स्थित आहे. तीर्थद्रोही लोकांच्यात तो परस्पर कलह करवितो, असा समज आहे.
३५) चतुर्दन्त विनायक- कूणिताक्ष विनायकापासून ईशान्य दिशेस ध्रुवेश्वर देवळात स्थित आहे. याच्या दर्शनमात्रे समस्त विघ्नसंघ नाश पावतो, असे मानले जाते.
३६) द्वितुण्ड (द्विमुख) विनायक- क्षिप्रप्रसादन विनायकापासून पूर्व दिशेकडे सूर्यकुंडावर अवस्थित आहे. याच्या दर्शनाने भक्तास सर्वतोमुखी श्री प्राप्त होते, असे सांगितले जाते.
३७) ज्येष्ठ विनायक- चिंतामणी विनायकापासून आग्नेय दिशेस ज्येष्ठेश्वर देवळात काशीदेवीजवळ स्थित आहे. ज्येष्ठ शुक्ल चतुर्थीला पूजन केले असता हा विनायक सर्वदा ज्येष्ठता, श्रेष्ठता प्राप्त करून देतो, असा भक्तांचा विश्वास आहे. विनायकाची मूर्ती उभी आहे.
३८) गज विनायक- दन्तहस्त विनायकापासून दक्षिण दिशेकडे मारभूतेश्वर शिवमंदिरात स्थित आहे. याच्या आराधनेने गजान्तलक्ष्मी लाभते, असे भक्त मानतात.
३९) काल विनायक- पिचिण्डिल विनायकापासून दक्षिण दिशेकडे वडाच्या झाडाखाली स्थित आहे. याच्या आराधनेने कालभय दूर होते, असा भक्तांचा समज आहे.
४०) नागेश विनायक- उद्दण्डमुण्ड विनायकापासून दक्षिण दिशेकडे नागेश गणपती नागेश्वर मंदिरात भोसलेघाटावर स्थित आहे. नागेश विनायकाच्या दर्शनाने नागलोक प्राप्ती होत असते, असे सांगितले जाते.
षष्ठ आवरण- या आवरणातील विनायकांच्या नामश्रवणाने सिद्धिलाभ होत असतो, असे मानण्याची प्रथा आहे.
४१) मणिकर्ण विनायक- पूर्व दिशेकडे मणिकर्णिका घाटीकडे हा विनायक आहे. याच्या आराधनेने विघ्ने दूर होतात, असे सांगितले जाते.
४२) आशा विनायक- आग्नेय दिशेकडे मीरघाटावरील मारुती देवळात हा स्थित आहे. याची आराधना केली असता भक्तांच्या सर्व आशा व इच्छा पूर्ण होतात, असे भक्त मानतात.
४३) सृष्टी विनायक– दक्षिण दिशेस भगवती कालरात्री दुर्गेच्या मंदिराबाहेर व शुक्रेश्वर महादेव मंदिराजवळ हा विनायक आहे. हा विनायक सृष्टिसंहारसूचक मानला जातो.
 ४४) यक्ष विनायक : नैर्ऋत्य दिशेकडे ढुण्ढिराज गणपतीजवळ प्रतीकेश्वर महादेवाच्या पश्चिम दिशेस हा स्थित आहे. आराधना केली असता भक्तांची सर्व विघ्ने हा दूर करतो.
४५) गजकर्ण विनायक : पश्चिम दिशेकडे कोतवालपुरा मोहल्ल्यात ईशानेश्वर महादेवाच्या देवळात स्थित आहे. हा विनायक सर्वाचे क्षेम करीत असतो.
४६) चित्रघण्ट विनायक : वायव्य दिशेकडे रानिक्वॉ चौकात स्थित आहे. वाजणाऱ्या क्षुद्रघण्टिका घालणारा हा विनायक नगराची रक्षा करीत असतो, असे मानले जाते.
४७) स्थूलजङ्घविनायक : उत्तर दिशेकडे पशुपतिश्वर मंदिरात स्थित आहे. याची आराधना केल्यास तो पापांचे शमन करतो, अशी समजूत आहे.
४८) मङ्लविनायक : ईशान्य दिशेकडे मंगळागौरीच्या मंदिरात स्थित आहे. हा काशीनगरीचे सतत रक्षण करीत असतो, अशी धारणा आहे.
सप्तम आवरण – या आवरणातील विनायकांच्या पूजनाने भक्तांना मनोवांछित फळ मिळते, असा समज आहे.
४९) मोद विनायक : काशी करवट येथे स्थित हा विनायक कष्ट निवारण करतो, असे मानतात. भीमेश्वर देवळाजवळ असलेली ही मूर्ती एक फूट उंचीची आहे. मोद विनायक मंदिरात कृष्णगणेश चतुर्थीच्या दिवशी स्कंदपुराणात वर्णन केल्याप्रमाणे संकष्ट गणेशचतुर्थी कथा सांगितली जाते.
५०) प्रमोद विनायक : हा गणपती काशी करवट (नेपाली खपडा) येथे स्थित आहे. तो भक्तांचे कष्ट हरण करतो, असे मानले जाते. या विनायकाची मूर्ती १.५ फूट उंचीची असून उभी आहे. या मूर्तीच्या जवळ ९ शिवलिंग आणि ४ नंदीच्या मूर्ती आहेत.
५१) सुमुख विनायक : हा विनायक काशी करवट (नेपाली खपडा) येथे स्थित आहे. याची आराधना केल्याने कष्ट दूर होतात अशी समजूत आहे. ४-४।। फुटांची ही मूर्ती बसलेली आहे.
५२) दुर्मुख विनायक : कचौडी गल्ली येथे स्थित हा विनायक आराधकांचे कष्ट निवारण करतो, असे सांगितले जाते. या विनायकाची मूर्ती ३ फूट उंच असून द्विभुज आहे. एका हातात लाडू असून एक हात गुडघ्यावर आहे.
५३) गणनाथ विनायक : ढुण्ढिराज गल्लीत स्थित या विनायकाच्या आराधनेने सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते, असा भक्तांचा विश्वास आहे.
५४) ज्ञान विनायक : लाङ्लीश्वर मंदिराच्या बाहेर स्थित हा विनायक भक्तांचे कष्ट निवारण करतो, असे मानले जाते.
५५) द्वार विनायक : पंचपांडव मंदिरात स्थित हा गणपती कष्ट निवारण करतो, अशी समजूत आहे.
५६) अविमुक्त विनायक : विश्वनाथ मंदिरात नैर्ऋत्य दिशेकडे गौरी आणि विष्णू यांच्या समीप स्थित हा विनायक समस्त कष्टांचा प्रवाह नष्ट करतो, असे मानले जाते.
वरील छपन्न विनायकांमध्ये सहा विनायक दोन/ दोन नावांनी प्रसिद्ध आहेत. लंबोदर विनायक (चिंतामणी विनायक), वक्रतुण्ड विनायक (सरस्वती विनायक), दन्तहस्त विनायक (हस्तदन्त विनायक), द्वितुण्ड विनायक (द्विमुख विनायक), गज विनायक (राज विनायक), स्थूलजङ्घविनायक (मित्र विनायक). खरेतर काशिखंडातील वर्णन केलेले या छप्पन्न विनायकांचे नुसते स्मरण केल्याने साधकाचे कल्याण होते आणि त्याचे सर्व कष्ट दूर होतात, असे गणेशभक्त मानतात. या छप्पन्न विनायकांपैकी पंचक्रोशी यात्रेच्या दृष्टीने केवळ दहा गणपती अधिक महत्त्वपूर्ण आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
१) अर्क विनायक, २) दुर्ग विनायक, ३) देहली विनायक, ४) उद्दण्ड विनायक, ५) पाशपाणि विनायक, ६) सिद्धि विनायक, ७) मोद विनायक, ८) प्रमोद विनायक, ९) सुमुख विनायक, १०) दुर्मुख विनायक.
या छपन्न विनायकांचे वर्णन असलेले स्तोत्र काशिखंडाच्या ५७व्या अध्यायात येते. ढुण्ढिराज स्तोत्र नियमित म्हटल्याने साधकाची सर्व विघ्ने दूर होतात, सर्व पापे नष्ट होतात, असे मानले जाते.
गणेश पुराणातील सोमकांत राजाची कथा एकशे चोपन्नाव्या अध्यायात आलेली आहे. तेथे आकाशमार्गे जाताना सोमकांतराजाने वाराणसीमध्ये असलेल्या विश्वेशाच्या परिवारातील गणेशाची नावे विचारली असता दूताने ही ५६ विनायकांची नावे सांगितली असा उल्लेख येतो.
ही छप्पन्न विनायकांची यात्रा काशी तीर्थक्षेत्रातील प्रसिद्ध यात्रा होती. पूर्वी अनेक गणेशभक्त चार ते पाच दिवस पायी परिक्रमा करून आवर्जून ही विनायकाची यात्रा करीत असत. काशी येथील प्रसिद्ध ऋषितुल्य व्यक्ती श्रीकरपात्रीमहाराज ही छप्पन्न विनायकांची यात्रा  आपल्या अनुयायांसह सातत्याने करीत असत. आजच्या काळात मात्र फारच थोडे गणेशभक्त ही यात्रा करताना आढळतात.
अशी केली काशीविनायकांची यात्रा..
काशीतील छपन्न विनायकांची यात्रा करण्यासाठी मी जायचं ठरवलं तेव्हा सगळ्यात आधी याची चौकशी केली की अशी विनायक यात्रा कुणी केली आहे का? पण तसं कुणीच भेटलं नाही. फारसं कुणी ही यात्रा करत नाही आणि नवीन पिढीला तर त्याबद्दल फारसं काही माहीतही नाही असं मला समजलं. आपण मात्र ही यात्रा करायची असं मी ठरवलं आणि पत्नीसह गेलो.  ही यात्रा करण्यासाठी मला चार दिवस लागले. काशीक्षेत्री पंचक्रोशीत वेगवेगळ्या ठिकाणी ही देवळं आहेत. बनारस विद्यापीठातले संस्कृतचे प्राध्यापक डॉ. शामशास्त्री बापट यांची या कामात मला खूप मदत झाली. काशीतील पाळंदे गुरुजींनी तर ही यात्रा करण्यासाठी, त्यानुसार ठिकाणं शोधण्यासाठी एक मुलगाच सोबत दिला.
काशीखंडातील उल्लेखानुसार हे ५६ विनायक शोधणं तसं आव्हानाचंच होतं. मुळात त्यातले दोन विनायक सापडलेच नाहीत. जे ५४ विनायक सापडले, ते सगळे काशीखंड या धार्मिक गं्रथात उल्लेख केल्यानुसार साधारणपणे त्या त्या दिशेला, त्या त्या ठिकाणीच सापडले हे विशेष. फक्त फरक एवढाच होता की इतर सगळ्याच शहरांप्रमाणे आता काशीचेही शहरीकरण होत गेले आहे. जुनी बांधकामं पाडली गेली आहेत. नवीन इमारती, घरं, सोसायटय़ा बांधल्या गेल्या आहेत. हे नवं बांधकाम करताना ही छोटी छोटी जुनी देवळं तिथून हलवली आहेत. दुसरीकडे गेली आहेत तर काही ठिकाणी लोकांनी चक्क त्या मूर्ती आपल्या घरात नेऊन ठेवल्या आहेत तर काही ठिकाणी सोसायटय़ांमध्ये त्या विराजमान झाल्या आहेत. काही देवळं ही गंगेच्या घाटाच्या परिसरात होती. तिथे जाऊन सतत त्या घाटांच्या पायऱ्यांचे चढउतार करत तिथले विनायक शोधले. काही ठिकाणची देवळं अगदी गल्लीबोळात होती. हे गल्लीबोळ इतके लहान होते की त्यांच्यातून एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो. एक माणूस जात असेल तर समोरून येणाऱ्या दुसऱ्या माणसाला जागाच नाही, अशी परिस्थिती होती. बहुतेक ठिकाणी या मूर्ती बऱ्या स्थितीत होत्या, मंदिरांच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येईलच असं नाही. काही मंदिरांना उर्जितावस्था आहे तर काहींना नाही. काही अगदीच लहान तर काही मंदिरांमध्ये इतका काळोख की टॉर्च लावून तिथली मूर्ती पहावी लागली. ऐंशी टक्के ठिकाणी पूजाअर्चा- उपासना होते. वीस टक्के ठिकाणी काहीच होत नाही. काशीखंडात या गणपतींची जी नावं आहेत, त्या नावांचा आणि मूर्तीच्या स्वरूपाचा फारसा काही संबंध नाही, असंही आढळलं. म्हणजे मोद विनायक असं नाव असेल तर त्या मूर्तीच्या हातात मोदकसदृश काही आहे, असंच काही नाही. याचा अर्थ ही नावं पडण्यामागे आख्यायिका असाव्यात असा अंदाज करता येतो.
कॅथरिन कार्निटल नावाच्या कॅलिफोर्नियात राहणाऱ्या एका अमेरिकी स्त्रीने २००९ च्या आसपास ‘ढुंढिविनायक फॉर्म ऑफ गणेश अँड इट्स फिफ्टी सिक्स इनॅमेशन्स अ‍ॅट वाराणसी’ अशी पीएच.डी केल्याचं समजलं. मी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

First Published on September 6, 2013 1:17 am
Web Title: Travel Of Fifty Six Ganesha Temples
टॅग Ganesh Festival

No comments: