Ameya

Wednesday, 18 September 2019

Gajanan Vijay

    WHAT'S NEW?
    Loading...

    श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय २१


    || श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय २१ ||

    श्री गजानन महाराज गोसाव्याच्या वेषांत रामचंद्र पटलास दुष्टांत देत आहेत.


    ॥ श्रीगणेशाय नमः ॥
    जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा ।
    जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥
    देवा तूं आपणांस । पतितपावन नाम खास ।
    सर्वदा आहे धरिलेंस । याचा विचार करीं गा ॥२॥
    पाप्यावरी प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य ।
    पापीजनांनीं तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥३॥
    म्हणून माझ्या पातकासी । पाहूं नका हो हृषीकेशी ।
    धुणें येतें जलापासीं । स्वच्छ होतें म्हणून ॥४॥
    म्हणून पतितांचा कंटाळा । करुं नको रे घननीळा ।
    काय भूमीनें सांवरिला । दिलें आहे टाकून ॥५॥
    तूंच पतितपावन । तूंच पुण्यपावन ।
    या दोन्ही दोषांपासून । तुम्ही अलग सर्वदा ॥६॥
    सूर्य नाशी तमाप्रत । म्हणून कां तो कष्टी होत ।
    कांहीं न करावें लागत । तम नासण्या रवीशीं ॥७॥
    तम जों जों भेटण्या येई । तों तों तेथें प्रकाश होई ।
    अंधारत्व अवघें जाई । त्याचें तमाचें नारायणा ॥८॥
    पापपुण्याची वासना । तूंच उपजविशी नारायणा ।
    आपला रक्षण्या मोठेपणा । पापी तूंच निर्मिशी ॥९॥
    कांहीं असो आतां तरी । चिंता रहित मजला करी ।
    दासगणू हा घ्यावा पदरीं । हेंच आहे मागणें ॥१०॥
    तुझ्यावांचून मजप्रत । नाहीं वशिला जगतांत ।
    अवघेंच तुझ्या हातांत । आहे कीं रे पांडुरंगा ॥११॥
    श्रोते आतां सावधान । हा कळसाध्याय परिसा पूर्ण ।
    तुमचें भाग्य धन्य धन्य । संतकथा ऐकतसां ॥१२॥
    एकविधा निष्ठा ज्याची । जडली गजाननपदीं साची ।
    त्याच्या दुःखसंकटांची । होळीच होते निःसंशय ॥१३॥
    बांधीत असतां मंदिर । काम करीत शिखरावर ।
    एक होता मजूर । हाताखालीं गवंडयांच्या ॥१४॥
    तो धोंडा देतां मिस्तरीला । एकाएकीं झोक गेला ।
    तीस फुटांवरुन पडला । खालीं घडीव दगडावर ॥१५॥
    तो पडतां लोकांनीं पाहिला । जन म्हणती मेला मेला ।
    उंचावरुन खालीं पडला । आतां कशाचा वांचे तो ? ॥१६॥
    परी घडलें अघटित । कोठें न लागलें त्याप्रत ।
    जैसा चेंडू झेलितात । तैसें त्यांचें जाहलें ॥१७॥
    सोपानसाह्यें ज्यापरी । जन उतरती भूमीवरी ।
    तेथें झालें त्याचपरी । त्या मजुराकारणें ॥१८॥
    मजूर म्हणे लोकांला । माझा जेव्हां झोक गेला ।
    तेव्हां एकानें धरलें मला । पडतां पडतां करास ॥१९॥
    पाय भूमीसी लागतां क्षणीं । तो न दिसला मजलागुनी ।
    हें वृत्त ऐकुनी । लोक अवघे आनंदले ॥२०॥
    अभिश्राप कोणाचा । समर्थ ना घेती साचा ।
    हा योग पडण्याचा । दैवानेंच आला तुज ॥२१॥
    या तुझ्या पडण्यानें । स्पर्श केला समर्थानें ।
    तुझ्या कराकारणें । ऐसें भाग्य कोणाचें ? ॥२२॥
    असो एक बाई रजपुताची । जयपुराहून आली साची ।
    बाधा होती भूताची । तया अबलेकारणें ॥२३॥
    तिसी जयपूर ग्रामाला । दत्तात्रयाचा दृष्टान्त झाला ।
    तूं या रामनवमीला । जाई शेगांवाकारणें ॥२४॥
    तेथें संत जागती ज्योत । श्रीगजानन सद्‌गुरुनाथ ।
    ते या तुझ्या पिशाच्याप्रत । मुक्ति देतील निःसंशयें ॥२५॥
    या दृष्टान्तेंकरुन । आपुल्या दोन मुलांसी घेऊन ।
    रामनवमीसाठीं जाण । बाई आली शेगांवा ॥२६॥
    प्रतिपदेपासून भला । उत्सवासी आरंभ झाला ।
    अफाट समुदाय मिळाला । नवमीस श्रोते शेगांवीं ॥२७॥
    काम सभामंडपाचें । चाललें होतें तेथ साचें ।
    खांब मोठमोठे दगडाचे । उभे केले असती ॥२८॥
    दीड फूट जाडीचा । पांच फूट लांबीचा ।
    प्रत्येक खांब दगडाचा । ऐसे होते किती तरी ॥२९॥
    उत्सवाच्या निमित्त भलें । काम भक्तांनीं बंद केलें ।
    खांब होते बसविलेले । नुसते मात्र ते ठाईं ॥३०॥
    श्रीरामाचा जन्म झाला । प्रसादासाठीं लोटला ।
    जनांचा तो समुदाय भला । तो न मसी वर्णवे ॥३१॥
    त्या गर्दीत ही बाई । उभी खांबास एक्या पायीं ।
    होती तिला सोसली नाहीं । गर्दी ती यत्किंचित ॥३२॥
    म्हणून खांबाच्या आश्रया । गेली निर्भय व्हावया ।
    गर्दी ती चुकवावया । परी झालें विपरीत ॥३३॥
    तोच खांब कोसळला । तिच्या शरीरा पडला ।
    तो पहातां लोकांला । ऐसें वाटूं लागलें ॥३४॥
    तिचा बहुतेक गेला प्राण । ही बाई कोठील कोण ? ।
    लहान मुलें दिसतीं दोन । खांबाखालीं येधवां ॥३५॥
    दहावीस जणांनीं । खांब काढिला अंगावरुनी ।
    पाणी मुखांत घालोनी । लोबोकडे पाठविलें ॥३६॥
    ही लोबो डाँक्टरीण । शस्त्रविद्येंत अतिप्रवीण ।
    ही जातीनें ख्रिश्चन । भक्त येशू ख्रिस्ताची ॥३७॥
    तिनें ह्या रजपूतिणीला । रीतीप्रमाणें उपचार केला ।
    लोबो म्हणे ना लागला । मार इला कोठेंच ॥३८॥
    हें आश्चर्य खरोखर । खांब दगडाचा होता थोर ।
    त्याच्या खालीं शरीर । सुरक्षित रहावें कसें ॥३९॥
    आश्चर्य वाटलें लोकांला । प्राण बाईचा वांचला ।
    हा जो कांहीं प्रकार झाला । तो घडला इतुक्यास्तव ॥४०॥
    खांब पाडून अंगावरी । भूत जें होतें शरीरीं ।
    त्या भूतास मुक्ति खरी । दिधली त्या गजाननें ॥४१॥
    बाई होऊन पूर्ववत । गेली जयपूर शहराप्रत ।
    नांदूं लागली आनंदांत । ऐसा प्रभाव स्वामीचा ॥४२॥
    ऐसेंच एका उत्सवाची । नाईक नवर्‍याच्या मस्तकांसी ।
    सोडीत असतां मंडपासी । लाकडी गोल पडला हो ॥४३॥
    तोही गोल थोर होता । परी स्वामीची अगाध सत्ता ।
    कोठेंही ना आघात होतां । नाईक नवरा वांचला ॥४४॥
    पुत्र कृष्णाजी पाटलाचा । रामचंद्र नांवाचा ।
    परमभक्त समर्थांचा । एक असे शेगांवीं ॥४५॥
    एके दिवशीं त्याच्या घरीं । येते झाले साक्षात्कारी ।
    ऐन दुपारच्या अवसरीं । गोसाव्याच्या रुपानें ॥४६॥
    भूक लागलि मला देखा । अन्न कांहीं देतां कां ? ।
    ऐसें म्हणून मारिली हांका । रामचंद्र पाटलातें ॥४७॥
    पाटील मूळचा भाविक । त्याची वाटलें कौतुक ।
    गोसाव्याची ऐकून हांक । दारामाजीं पातला ॥४८॥
    निरखून पाहातां गोसाव्यासी । तों ते असावे पुण्यराशी ।
    स्वामी गजानन निश्चयेंसी । ऐसें त्याला वाटलें ॥४९॥
    गोसाव्याचा धरुन हात । आला घेऊन घरांत ।
    दिला बसण्या पाट । पूजा केली पायांची ॥५०॥
    गोसावी म्हणे पाटलाला । आज मी मुद्दाम आलों मुला ।
    कांहीं तुज सांगण्याला । तें तूं ऐके मनापून ॥५१॥
    कर्जाची न चिंता करी । तें फिटून जाईल निर्धारीं ।
    अरे उन्हाळ्यांत गोदावरी । थोडी कोरडी पडतसे ॥५२॥
    तैसाच हाही प्रकार । संपन्नतेचा येईल पूर ।
    कृपाघन वर्षल्यावर । श्रीहरीचा समज हें ॥५३॥
    उष्टें माझे जें ठायीं । पडेल बापा तें ठाईं ।
    कशाचेंही कधीं पाही । कमी नाहीं पडणार ॥५४॥
    आण ताट वाढून । सुग्रास देईं भोजन ।
    मर्जी असल्या पांघरुण । घाल एखादें अंगावरी ॥५५॥
    पूजा अन्न दक्षिणा । याचकांसी दिल्या जाणा ।
    तें पावतें नारायणा । येविषयीं शंका नसे ॥५६॥
    परी तो याचक । आधीं पाहिजे शुद्ध देख ।
    त्यावांचून हें कौतुक । होणार नाहीं कधींही ॥५७॥
    आणलें ताट वाढूनी । गोसावी जेवला प्रेमानीं ।
    पांच रुपये पाटलांनीं । दक्षिणा ठेविली त्याच्या करां ॥५८॥
    तैं गोसावी म्हणाला । ही दक्षिणा नको मला ।
    तूं पाहिजे कारभार केला । गजाननाच्या मठांत ॥५९॥
    तीच दक्षिणा मागण्यासी । मी आलों तुझ्यापासीं ।
    ती आनंदें देईं मसी । म्हणजे कल्याण होईल ॥६०॥
    समर्थसेवेची दक्षिणा । देऊन तुष्टवी माझ्या मना ।
    योग्य मनुष्य तुझ्याविणा । कोणी न येथें सांप्रत ॥६१॥
    तुझी कांता आजारी । वरचेवरी पडते जरी ।
    तीही होईल बापा परी । ही दक्षणा दिल्यानें ॥६२॥
    बोलाव तुझ्या पुत्राप्रत । त्याच्या कंठीं एक ताईत ।
    बांधितों म्हणजे चेटूकभूत । याचीन बाधा होय त्यासी ॥६३॥
    का कीं ही जमेदारी । कठीण आहे भूमीवरी ।
    पाण्याशींच पाणी वैरी। ये ठाईं होत असे ॥६४॥
    पाटीलकीचें तुझें वतन । हें वाघाचें पांघरुण ।
    त्याचा उपयोग करणें जाण । अति जपून रामचंद्रा ॥६५॥
    द्वेषी मन असूं नये । सन्नीतीला सोडूं नये ।
    राजाविरुद्ध जाऊं नये । उगीच भलत्या कामांत ॥६६॥
    साधु कोण संत कोण ? । हें पाहावें शोधून ।
    दांभिकांच्या नादीं जाण । कदापीही लागूं नये ॥६७॥
    हीं व्रतें पाळल्यास । तुझा ऋणी श्रीनिवास ।
    होईल या वचनास । असत्या माझ्या मानूं नको ॥६८॥
    आय पाहून खर्च करी । दंभाचार कधीं न वरी ।
    साधुसंत येतां घरीं । विन्मुख त्याला लावूं नये ॥६९॥
    अपमान खर्‍या संतांचा । झाल्या कोप ईश्वराचा ।
    होतसे बापा साचा । संतचरणीं प्रेमा धरीं ॥७०॥
    आपल्या वंशजाचें उणें । पाहूं नये कदा मनें।
    सोयर्‍याधायर्‍यांकारणें । समयानुसार मान द्यावा ॥७१॥
    कोप असावा बाह्यात्कारी । दया असावी अंतरीं ।
    जैसें का तें फणसावरी । कांटे आंत गोड गरे ॥७२॥
    मी तुझ्या पाठीस । आहे जाण रात्रंदिवस ।
    ताईत बांधून कंठास । गोसावी जाऊं लागला ॥७३॥
    दाराबाहेर जातां भला । अंतर्धान पावला ।
    पाहातां पाहातां झाला । दिसेनासा रस्त्यांत ॥७४॥
    पाटील अवघ्या दिवसभर । मानसीं करी विचार ।
    हा गोसावी कोणी इतर । नसावा ऐसें वाटतें ॥७५॥
    श्रीगजाननस्वामी मला । आले उपदेश करायाला ।
    घेऊन गोसावीवेषाला । हें आतां समजलें ॥७६॥
    रात्रीं स्वप्नीं येऊन । संशय केला निरसन ।
    ऐसें स्वामीगजानन । भक्तवत्सल खरोखरी ॥७७॥
    श्रीगजानन चरित्र । तारक असोनी परमपवित्र ।
    अनुभव येण्या मात्र । सबळ निष्ठा पाहिजे ॥७८॥
    या ग्रंथाची अवतरणिका । देतों आतां ही तुम्ही ऐका ।
    वेळ उगा दवडूं नका । पूर्ण व्हावें सावधान ॥७९॥
    प्रथमाध्यायीं मंगलाचरण । देवगुरुचें वंदन ।
    केलें पुढें निवेदन । गजाननाच्या पूर्वचरिता ॥८०॥
    माघमासीं सप्तमीसी । समर्थ आले शेगांवासी ।
    देवीदासाच्या सदनापासीं । दिसते झाले प्रथमतः ॥८१॥
    बंकटलाल दामोदर । दोन होते चतुर नर ।
    त्यांनीं परीक्षा अखेर । केली गजाननाची ॥८२॥
    कथा द्वितीयाध्यायांत । येणेंपरी आहे सत्य ।
    गोविंदबुवाच्या कीर्तनांत । महाराज येऊन बैसले ॥८३॥
    पितांबर शिंप्याला । रस्त्यांत चमत्कार दाविला ।
    बंकटलालाच्या घराला । महाराज गेले शेवटीं ॥८४॥
    कथा तृतीयाध्यायाला । गोसाव्यानें नवस केला ।
    गांजाचा श्रीसमर्थाला । पाजण्याचा विबुध हो ॥८५॥
    त्याची इच्छा पुरविली । प्रथा गांजाची पडली ।
    तेथपासोनी भली । शेगांवचे मठांत ॥८६॥
    जानराव देशमुखाचें । गंडांतर टाळिलें साचें ।
    देऊन तीर्थ पायांचें । आपुलें तें स्वामींनीं ॥८७॥
    मृत्यूचे ते प्रकार । तेथें कथिले सविस्तर ।
    तुकारामासी दिला मार । ढोंग करितो म्हणोनी ॥८८॥
    कथा चतुर्थाध्यायाठायीं । येणें रीतीं असे पाही ।
    जानकीरामें दिला नाहीं । विस्तव चिलमीकारणें ॥८९॥
    किडे पडले चिंचवण्यांत । अन्न गेलें वायां सत्य ।
    सोनारानें जोडून हात । केली विनंती समर्थांला ॥९०॥
    त्याचा अपराध क्षमा केला । पूर्ववत्‌ केले चिंचवण्याला ।
    जानकीराम भक्त झाला । ते दिवसापासून ॥९१॥
    होते दोन कान्होले । उतरंडीसी ठेविलेले ।
    तेच समर्थें मागितले । खाया चंदू मुकिंदासी ॥९२॥
    चिंचोलीच्या माधवाला । यमलोक दावून मुक्त केला ।
    शिष्याहातें करविला । थाट वसंतपूजेचा ॥९३॥
    कथा पंचमाध्यायांत । महाराज पिंपळगांवांत ।
    बसले शंकराच्या मंदिरांत । पद्मासन घालोनियां ॥९४॥
    गुराख्यांनीं पूजा केली । गांवची मंडळी तेथें आली ।
    महाराजांसी घेऊन गेली । पिंपळगांवाकारणें ॥९५॥
    हें कळलें बंकटलाला । तो पिंपळगांवास गेला ।
    महाराजासी आणण्याला । परत शेगांवाकारणें ॥९६॥
    समर्थासी आणले परत । कांहीं दिवस राहून तेथ ।
    पुन्हां गेले अकोलींत । भास्करासी तारावया ॥९७॥
    कोरडया ठणठणीत विहिरीला । जिवंत झरा फोडीला ।
    एका क्षणांत आणिलें जला । त्या कोरडया विहिरी ठायीं ॥९८॥
    भास्कराची उडवलि भ्रांती। घेऊन आले तयाप्रती ।
    शेगांवास गुरुमूर्ति । ही कथा पंचमांत ॥९९॥
    षष्ठाध्यायीं ऐसी कथा । बंकटलालें सद्‌गुरुनाथा ।
    मक्याचीं कणसें खाण्याकरितां । नेलें आपुल्या मळ्यांत ॥१००॥
    गांधीलमाशा उठल्या तेथ । लोक होऊन भयभीत ।
    पळूं लागले असती सत्य । जीव आपुला घेऊनी ॥१॥
    बाधा गांधीलमाश्यांची । महाराजा न झाली साची ।
    घेतली असे शिष्यत्वाची । परीक्षा बंकटलालाची ॥२॥
    नरसिंगजीस भेटण्याला । स्वामी गेले अकोटाला ।
    जो नरसिंगजी होता भला । शिष्य कोतशा अल्लीचा ॥३॥
    कांहीं दिवस राहिले । अकोटामाजीं भले ।
    नरसिंगजीसी हितगुज केलें । बंधु आपुला म्हणून ॥४॥
    चंद्रभागेच्या तीरीं । शिवरग्रामाभीतरीं ।
    कृपा व्रजभूषणावरी । केली असें जाऊन ॥५॥
    मारुतीच्या मंदिरांत । श्रावणमासाच्या उत्सवांत ।
    समर्थ आले राहण्याप्रत । येथें षष्ठमाची पूर्तता ॥६॥
    गांवींची पाटीलमंडळी । अवघी आडदांड होती भली ।
    हमेश होई बोलाचाली । त्यांची समर्थाबरोबर ॥७॥
    हरि पाटलासवें भले । महाराज कुस्ती खेळले ।
    मल्लविद्येचें दाविलें । प्रत्यंतर बहुताला ॥८॥
    उंसाचा चमत्कार । दाऊनियां साचार ।
    अभिमानाचा परिहार । केला पाटील मंडळींच्या ॥९॥
    भिक्यानामें दिला सुत । खंडू कडताजी पाटलाप्रत ।
    आम्रभोजनाचें व्रत । चालविण्यास कथिलें पाटलाला ॥११०॥
    ऐशा कथा सप्तमाध्यायीं । कथन केल्या आहेत पाही ।
    निष्ठा समर्थांच्या ठायीं । जडली पाटीलमंडळींची ॥११॥
    कथा आहे अष्टमांत । दुफळी पाटील देशमुखांत ।
    अर्ज दिधला सरकारांत । महारांनीं विरुद्ध पाटलाच्या ॥१२॥
    खंडूवरी बालंट आलें। तें समर्थांनीं नासिलें ।
    निर्दोष सुटते झाले । खंडू पाटील खटल्यांतून ॥१३॥
    तेलंगी ब्राह्मणाला । वेद म्हणून दाखविला ।
    आपण कोण हा कळविला । सहज लीलेनें समाचार ॥१४॥
    कृष्णाजीच्या मळ्याशीं । महाराज राहिले छपरासी ।
    मंदिराच्या सान्निध्यासी । चंद्रमौळी हराच्या ॥१५॥
    ब्रह्मगिरी गोसाव्याला । अभिमानविरहित केला ।
    "नैनं छिन्दन्ति" श्र्लोकाला । रहस्यासह सांगून ॥१६॥
    जळत्या पलंगाच्यावर । महाराज बसते झाले स्थिर ।
    न जाळे वैश्वानर । केव्हांही खर्‍या संताला ॥१७॥
    कथा नवमाध्यायाला। द्वाड घोडा शांत केला ।
    खूण नवस करणाराला । दिली असे गांजाची ॥१८॥
    दासनवमीचे उत्सवासी। समर्थ बाळापुरासी ।
    घेऊन आपल्या शिष्यांसी । बाळकृष्णाच्या घरां गेले ॥१९॥
    बाळकृष्णालागून । करविलें समर्थाचें दर्शन ।
    संशयरहित केलें मन । तया रामदास्याचें ॥१२०॥
    दशमाध्यायीं सुरेख । उमरावतीचें कथानक ।
    उपरति झाली पुरी देख । तेथें बाळाभाऊला ॥२१॥
    गणेश आप्पा चंद्राबाई । यांनीं अर्पिला संसार पाईं ।
    भावभक्तीनें लवलाही । श्रीगजाननस्वामीच्या ॥२२॥
    गणेश दादा खापडर्याला । शुभ आशीर्वाद दिधला ।
    छत्रीनें मारुन बाळाला । परीक्षा त्याची घेतली ॥२३॥
    द्वाड गाय सुकलालाची । अति गरीब केली साची ।
    दांभिक भक्ति घुडयाची । कशी ती कथन केली ॥२४॥
    एकादशाध्यायीं कथन । भास्करासी डसला श्वान ।
    आले त्र्यंबकेश्वरीं जाऊन । गोपाळदासा भेटले ॥२५॥
    झ्यामसिंगाच्या विनंतीसी । देऊन मान अडगांवासी ।
    येते झाले पुण्यराशी । श्रीगजाननमहाराज ॥२६॥
    निजधामा भास्कर गेला । त्याचा देह ठेविला ।
    द्वारकेश्वरासन्निध भला । सतीबाईचे शेजारीं ॥२७॥
    आज्ञा केली कावळ्यांला । तुम्ही न यावें या स्थला ।
    वांचविले गणु जवर्‍याला । सुरुंग उडतां विहिरींत ॥२८॥
    शेट बचुलालाची । कथा द्वादशाध्यायीं साची ।
    मूर्ति निरिच्छपणाची । प्रत्यक्ष होते महाराज ॥२९॥
    स्वामीचें वस्त्र नेसला । पितांबर शिंपी कोंडोलीला ।
    स्वइच्छेनें येता झाला । परमभक्त होता जो ॥१३०॥
    पितांबरानें कोंडोलीसी । बळिरामाच्या शेतासी ।
    वठलेलिया आंब्यासी । पानें फळें आणविलीं ॥३१॥
    पितांबर राहिला कोंडोलींत । तेथेंच झाला समाधिस्थ ।
    नव मठ झाला स्थापित । शेगांवीं समर्थ इच्छेनें ॥३२॥
    विचार करुनी मानसीं । बसून रेतीच्या गाडीसी ।
    महाराज नव्या मठासी। आले जुन्या मठांतून ॥३३॥
    झ्यामसिंगानें मुंडगांवाला । नेलें गजाननस्वामीला ।
    पर्जन्यानें घोटाळा । भंडार्‍याचा केला असे ॥३४॥
    झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट समर्था अर्पिली ।
    पुंडलिकाची निमाली । गांठ प्लेगची श्रीकृपें ॥३५॥
    कथाभाग तेराव्याचा । महारोग गोसाव्याचा ।
    हरण गंगाभारतीचा । केला असें गजाननें ॥३६॥
    बंडुतात्यासी भाग्य आलें । भूमींत धन सांपडलें ।
    कर्जापासून मुक्त केलें । समर्थानें निजकृपें ॥३७॥
    नर्मदेच्या स्नानास । सोमवती अमावास्यास ।
    नौका फुटतां छिद्रास । हात लाविला नर्मदेनीं ॥३८॥
    विडा माधवनाथाला । शिष्याहातीं पाठविला ।
    या कथा चवदाव्याला । वर्णिल्या असती साकल्यें ॥३९॥
    अध्याय तो पंधरावा । शिवजयंतीचा आहे बरवा ।
    आले अकोले नामक गांवा । टिळक बाळ गंगाधर ॥१४०॥
    भाकरी प्रसाद पाठविला । कोल्हटकराचे हस्तें भला ।
    मुंबईंत लोकमान्याला । ग्रहण करायाकारणें ॥४१॥
    श्रीधर गोविंद काळ्यास । करिते झाले उपदेश ।
    नको जाऊं विलायतेस । येथेंच आहे सर्व कांहीं ॥४२॥
    कथा ऐशा सोळाव्यासी । पुंडलीक अंजनगांवासी।
    जातां निवारिले त्यासी । येऊनिया स्वप्नांत ॥४३॥
    पादुकाचा प्रसाद त्याला । झ्यामसिंगहस्तें पाठविला ।
    कवराच्या भाजीभाकरीला । ग्रहण केलें आनंदें ॥४४॥
    छरा तुकारामाचा । कानामधून पडला साचा ।
    ह्या अशा कथांचा । समावेश सोळाव्यांत ॥४५॥
    सतराव्यांत कथा सुरस । विष्णूसाच्या घरास ।
    जाया मलकापुरास । समर्थ निघाले गाडींतून ॥४६॥
    नग्न फिरती म्हणूनी । खटला भरला पोलिसांनीं ।
    केवळ अहंपणानीं । सत्पुरुषासी त्रास द्याया ॥४७॥
    महताबशा सांईला । पाठवून दिलें पंजाबाला ।
    हिंदुयवनांविषयीं केला । कळकळीचा बोध त्यासी ॥४८॥
    बापुरावाच्या कांतेसी । भानामती न मानी साची ।
    भेट गंगाभागीरथीसी । झाली अकोटीं विहिरींत ॥४९॥
    कथा बायजा माळणीची । अठराव्यामाजीं साची ।
    कवर डाँक्‍टरच्या फोडाची । कथा यांत ग्रथित असे ॥१५०॥
    महाराज गेले पंढरीला । घेऊन अवघ्यां लोकांला ।
    तेथें बापुना काळ्याला । दर्शन हरीचें करविलें ॥५१॥
    कवठे बहादुरचा वारकरी । मरीनें झाला आजारी ।
    त्यास घटकेमाझारीं । समर्थानें बरें केलें ॥५२॥
    एक्या कर्मठ ब्राह्मणाला । श्वान उठून मेलेला ।
    दाऊन त्याचा गलित केला । कर्माभिमान श्रोते हो ॥५३॥
    कथा एकोणविसाव्यासी । दिला काशीनाथपंतासी ।
    आशीर्वाद तो अतिहर्षी । तो येता दर्शना ॥५४॥
    गोपाळ मुकिंद बुटी भला । नागपुरासी घेऊन गेला ।
    श्रीगजाननस्वामीला । आपुल्या गेहाकारणें ॥५५॥
    त्याच्या मनीं ऐसा हेत । महाराज ठेवावें नागपुरांत ।
    परी हरि पाटलांनीं परत । आणिले समर्थ शेगांवीं ॥५६॥
    धार-कल्याणचे रंगनाथ । साधु आले भेटण्याप्रत ।
    समर्थासी शेगांवांत । ऐसे आणि कितीतरी ॥५७॥
    श्रीवासुदेवानंद सरस्वती । जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति ।
    दृष्टादृष्ट होतां नुसती । आनंद झाला उभयतातें ॥५८॥
    तेव्हां बाळाभाऊला । जो कां होता संशय आला ।
    तो समर्थांनीं निवटिला । करुनियां उपदेश॥५९॥
    केलें खळ्याचें संरक्षण । गाढवाचे पासून ।
    समर्था मारितां आलें मरण । नारायणासी बाळापुरीं ॥१६०॥
    गजाननाचे कृपें भलें । जाखडयाचें लग्न झालें ।
    कपीलधारेसी दिधलें । दर्शन निमोणकराला ॥६१॥
    तुकारामें आपुला । पुत्र समर्था वाहिला ।
    नारायण नामें भला । सेवा करावयाकारणें ॥६२॥
    पंढरीतें जाऊन । विठ्ठलातें विचारुन ।
    महाराज आले परतून । शेगांवाकारणें ॥६३॥
    पुढें भाद्रपदमासासी । ऋषि-पंचमीच्या पुण्य दिवशीं ।
    आधुनिक कालाचा हा ऋषि । समाधिस्त जहाला ॥६४॥
    विसाव्यामाजीं इतर । श्रींची समाधि झाल्यावर ।
    जे का घडले चमत्कार । त्यांचें वर्णन केलें असे ॥६५॥
    जे जे भाविक भक्त कोणी । त्यांना त्यांना अजुनी ।
    दर्शन देती कैवल्यदानी । त्यांच्या इच्छा पुरवून ॥६६॥
    आतां हा एकविसावा । अवघ्या कथेचा कळस बरवा ।
    अवघ्यांचा लेखावा । तुम्ही सार श्रोते हो ॥६७॥
    प्रत्यक्षापरी प्रकार । येथें होती वरच्यावर ।
    म्हणून म्हणणें आहे सार । अवघ्यांचें या अध्याया ॥६८॥
    वर्गणीच्या जोरें भलें । समाधीचें काम झालें ।
    मनापासून भक्त झटले । वर्गणी गोळा कराया ॥६९॥
    ऐसें भव्य सुंदर । काम कोठें न भूमीवर ।
    धर्मशाळा चौफेर । चहूं बाजूंनीं बांधिल्या ॥१७०॥
    या भव्य कामाला । बहुतांनीं हात लाविला ।
    त्यांचीं नांवें तुम्हांला । सांगतां ग्रंथ वाढेल ॥७१॥
    मुख्य जे होते त्यांतून । त्यांचीं नांवें करितों कथन ।
    कुकाजीचा नंदन । हरी पाटील नाम ज्याचें ॥७२॥
    सांगवी गांवचा बनाजी । उमरीचा तो गणाजी ।
    बटवाडीचा मेसाजी । लाडेगावचा गंगाराम ॥७३॥
    भागू, नंदू, गुजाबाई । अकोल्याची बनाबाई ।
    सुकदेव पाटलाची ती आई । यांनीं हजारों रुपये दिले ॥७४॥
    पाटील रामचंद्र कृष्णाजी । दुसरा दत्तु भिकाजी ।
    पळसखेडचा सुखदेवजी । मार्तन्ड गणपती शेगांवचा ॥७५॥
    बालचंद्राचा रतनलाल । पंचगव्हाणचा दत्तुलाल ।
    त्याच गांवींचा बिसनलाल । अंबरसिंग टाळकीचा ॥७६॥
    किसन बेलमंडळेकर । विठोबा पाटील चावरेकर ।
    हसनापुरचा राहणार । गंगाराम नाम ज्याचें ॥७७॥
    या दानशूरांनीं । मोठमोठया रकमा देऊनी ।
    केली मठाची उभारणी । भक्तिस्तव समर्थांच्या ॥७८॥
    कोठया कचेरी स्वैंपाकघरें । सोपे उत्तम प्रकारें ।
    बांधिले असती साजिरे । समाधीच्या चौफेर ॥७९॥
    लोकांनीं ज्या देणग्या दिल्या । त्या बांधकामीं जिरुन गेल्या ।
    परी पुष्कळ गोष्टी राहिल्या । बांधण्याच्या अवशेष ॥१८०॥
    त्यासाठीं युक्ति केली । वर्गणी जमवण्यासाठीं भली ।
    योजना ती ऐशी झाली । ती ऐका विबुध हो ॥८१॥
    बसविला शेतसार्‍यावर । समर्थांचा धार्मिक कर ।
    कोणासी न करितां जोर । रुपयामागें एक आणा ॥८२॥
    तैशीच बाजारपेठेशीं । धान्य अथवा कपाशी ।
    जी येईल विकायासी । पट्टी बसविली त्यावर ॥८३॥
    गाडीमागें अर्धा आणा । हर्ष वाटे देतांना ।
    कां कीं समर्थांच्या चरणां । निष्ठा होती सर्वांची ॥८४॥
    समाधीपुढें स्वाहाकार । होऊन गेले अपार ।
    परी त्यांतून मोठे चार । सर्वश्रुत जाहले ॥८५॥
    शतचंडीचें अनुष्ठान । ब्राह्मणांच्या करवीं जाण ।
    केलें आदरेंकरुन । किसनलाल शेठजीनें ॥८६॥
    अनुष्ठान शतचंडीचें । करणें अति अवघड साचें ।
    अधिकशून्य ना खपायाचें । जगदंबे कालिकेस ॥८७॥
    कांहीं चुकतां विधानांत । तात्काळ होतें विपरीत ।
    काम्य अनुष्ठानाप्रत । भीति चहूं बाजूंनीं ॥८८॥
    वडील किसनलालाचा । बंकटलाल नांवाचा ।
    भक्त होता समर्थांचा । एकनिष्ठ पहिल्यापून ॥८९॥
    पूर्ण आहुतीच्या दिवशीं । त्या बंकटलाल भक्तासी ।
    व्याधि उद्भवली शरीरासी । प्राणांताचा समय आला ॥१९०॥
    लोक गेले घाबरुन । म्हणती हें काय आलें विघ्न ।
    शतचंडीचें अनुष्ठान । करतां विपरीत व्हावें कां ? ॥९१॥
    बंकटलाल म्हणे पुत्रासी । भिऊं नकोस मानसीं ।
    माझा तारिता पुण्यरासी । समाधीसी बसलासे ॥९२॥
    तो अवघें करील बरें । नका होऊं बावरें ।
    पूर्ण आहुतीचें काम सारें । घ्यावें सशास्त्र उरकून ॥९३॥
    माझा स्वामी गजानन । येऊं न देई कदा विघ्न ।
    भक्ताचें करण्या संरक्षण । मुळींच बसला येथें तो ॥९४॥
    तेंच पुढें सत्य झालें । व्याधीचें स्वरुप मावळलें ।
    एका बाईचें निमालें । भूत शतचंडींत या ॥९५॥
    बनाजी तिडके सांगवीकर । यांनीं केला स्वाहाकार ।
    कसुर्‍याची रहाणार । गुजाबाई नाम जिचें ॥९६॥
    चापडगांवींचा वामन । शामरावाचा नंदन ।
    यांनींही एक यज्ञ । केला समाधीच्या पुढें ॥९७॥
    ऐसीं धर्मकृत्यें किती तरी । झालीं समर्थासमोरी ।
    खरे खरेच साक्षात्‌कारी । श्रीगजाननमहाराज ॥९८॥
    यावत्‌ कालपर्यंत । लोक होते निष्ठावंत ।
    तावत्‌ कालपर्यंत । वर्‍हाड होता सुखी बहु ॥९९॥
    जसजसी निष्ठा कमी झाली । तों तों विपन्न दशा आली ।
    अवदसेनें घातली । माळ कंठीं वर्‍हाडाच्या ॥२००॥
    विपुल पिकणें टाकिलें । काश्यपीनें पहा भले ।
    नवे वाहूं लागले । वारे सर्व वर्‍हाडांत ॥१॥
    वर्‍हाडाची ऐसी दैना । समर्थांसी पाहवेना ।
    म्हणून घेतलें आपणां । कोंडोनीं त्यांनीं जलांत ॥२॥
    तीस फुटांपासून । पाया आणिला भरुन ।
    तेथेंच कां हें जीवन । निर्माण व्हावें श्रोते हो ॥३॥
    म्हणून ऐसें वाटतें । राग आला समर्थांतें ।
    म्हणून त्यांनीं जलातें । भोंवतीं केलें निर्माण ॥४॥
    सुखसंपन्न पहिल्यापरी । वर्‍हाड व्हावा निर्धारी ।
    ऐसें चित्तांत असल्या जरी । या वर्‍हाडी जनांच्या ॥५॥
    तरी त्या अवघ्या जनांनीं । श्रीगजाननाच्या चरणीं ।
    पूर्ववत् निष्ठा ठेवूनी । सुखालागीं अनुभवावें ॥६॥
    ऐसें न जरी करतील । तरी याहीपेक्षां येईल ।
    वर्‍हाडासी बिकट काळ । याचा विचार करा हो ॥७॥
    गजाननपदीं निष्ठा ठेवा । सुख-अनुभव सर्वदा घ्यावा ।
    कुतर्कासी मुळीं न द्यावा । ठाव आपुल्या मानसीं ॥८॥
    या गजाननरुप जमिनींत । जें जें कांहीं पेराल सत्य ।
    तें तें मिळणार आहे परत । बहुत होऊन तुम्हांला ॥९॥
    दाणे टाकिल्या खडकावरी । त्यांचीं न रोपें होतीं खरीं ।
    याचा विचार अंतरीं । सर्व काळ करा हो ॥२१०॥
    कंटाळा संतसेवेचा । ज्या ज्या प्रांता येत साचा ।
    त्या त्या प्रांतीं दुष्काळाचा । प्रादुर्भाव होतसे ॥११॥
    धर्मश्रद्धा ही वाघीण । गेल्या मनरुपी दरींतून ।
    दुर्वासनेचे कोल्हे जाण । येऊन बसतील ते ठायां ॥१२॥
    भक्ति शुचिर्भूत अंगना । अभक्ति वारांगना ।
    तिच्या नादीं लागल्या जाणा । विटंबनाच सर्वत्र ॥१३॥
    सन्नीतीला सोडूं नका । धर्मवासना टाकूं नका ।
    शत्रु न माना एकमेकां । तरीच शक्ति वाढेल ॥१४॥
    ऐसें तुम्ही वागल्यास । येतील चांगले दिवस ।
    या वर्‍हाड प्रांतास । हें कधींहि विसरुं नका ॥१५॥
    एकदां तरी वर्षांतून । घ्यावें गजाननाचें दर्शन ।
    एकदां तरी पारायण । करा गजाननचरित्राचें ॥१६॥
    हा एकवीस अध्यायांचा । गजाननविजय नांवाचा ।
    नैवेद्य एकवीस मोदकांचा । गजाननासी अर्पा हो ॥१७॥
    वा हे अध्याय साचार । माना एकवीस दुर्वांकुर ।
    पारायणरुपें निरंतर । वाहाव्या गजाननासी ॥१८॥
    सद्‌भाव जो मानवाचा । तोच दिवस चतुर्थीचा ।
    प्रेमरुपी चंद्राचा । उदय झाला पाहिजे ॥१९॥
    मग या ग्रंथाचें अक्षर । एकेक हें दुर्वांकुर ।
    अर्थ शब्दाचा साचार । मोदक समजा विबुध हो ॥२०॥
    तो अर्पून गजानना । पारायणरुपी पारणा ।
    साधून घ्यावा करा ना । वेळ आतां थोडकाही ॥२१॥
    हा ग्रंथ ना कादंबरी । ती गजाननाची लीला खरी ।
    येथें जो अविश्वास धरी । तो बुडेल निःसंशय ॥२२॥
    श्रीगजाननस्वामी चरित्र । जो नियमें वाचील सत्य ।
    त्याचे पुरतील मनोरथ । गजाननकृपेनें ॥२३॥
    हें गजाननचरित्र भागीरथी । कथा या तोय निश्चिती ।
    महाराष्ट्र ओंव्या तयावरती । लहरी समजा विबुध हो ॥२४॥
    वा कल्पवृक्ष हें स्वामीचरित्र । शाखा अध्याय तयाप्रत ।
    पद्मरचना हीच सत्य । पालवी या वृक्षाची ॥२५॥
    जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव ।
    संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥२६॥
    हा ग्रंथ केवळ चिंतामणी । चिंतिलें फळ देईल जाणी ।
    दृढतर विश्वास असल्या मनीं । हें मात्र विसरुं नका ॥२७॥
    जेथें गजाननचरित्राचा । पाठ होईल नित्य साचा ।
    तेथें वास लक्ष्मीचा । चिरकाल होईल हो ॥२८॥
    दारिद्रयासी मिळेल धन । रोगीयासी आरोग्य जाण ।
    साध्वी स्त्रीचें वांजपण । फिटेल याच्या वाचनें ॥२९॥
    निपुत्रिकासी होईल पुत्र । निष्कपटी मिळेल मित्र ।
    चिंता न राहील अणुमात्र । या ग्रंथाच्या वाचका ॥२३०॥
    दशमी एकादशी द्वादशीला । हा ग्रंथ जो वाची भला ।
    अनुपम येईल भाग्य त्याला । श्रीगजाननकृपेनें ॥३१॥
    गुरुपुष्य योगावरी । जो याचें पारायण करी ।
    बसून एक्या आसनावरी । राहूनियां शुचिर्भूत ॥३२॥
    त्याच्या अवघ्या मनकामना । खचित होतील पूर्ण जाणा ।
    कसल्याही असोत यातना । त्या त्याच्या निरसतील ॥३३॥
    जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत ।
    लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्म समंधाचा ॥३४॥
    ऐसें याचें महत्त्व । ये भाविकाला प्रचीत ।
    कुटिलदुष्टदुर्जनांप्रत । याचा अनुभव येणें नसे ॥३५॥
    मानसाची योजना । राजहंसासाठीं जाणा ।
    तैसें हें संतसज्जनां । मानस स्वामीचरित्र ॥३६॥
    पूर्वकालीं ज्ञानेश्वर । मीरा मेहता कबीर ।
    नामा सांवता चोखा महार । गोरा बोधला दामाजी ॥३७॥
    उंबरखेडी ऐनाथ । सखाराम अंमळनेरांत ।
    वा देव मामलेदार यशवंत । वा हुमणाबादी माणिकप्रभू ॥३८॥
    तेवींच हा वर्‍हाडांत । गजाननस्वामी सद्‌गुरुनाथ ।
    फरक नाहीं यत्किंचित । त्यांच्या यांच्या मधीं हो ॥३९॥
    आतां हीच विनंति । तुम्हां अवघ्यां भाविकांप्रती ।
    अत्यंत असूं द्यावी प्रीति । श्रीगजाननांचे चरणीं ॥२४०॥
    म्हणजे तुमची येरझार । जन्ममृत्यूची साचार ।
    होऊनियां व्हाल पार । दुस्तर भवामधूनी ॥४१॥
    आतां स्वामी दयाघना ! । तुला येवो माझी करुणा ।
    दासगणूच्या यातना । सकल निवारी कृपेनें ॥४२॥
    मी तुझा झालों भाट । मार्ग दावी मला नीट ।
    दुर्वासनेचा येतो वीट । चित्तामाजीं दयाळा ! ॥४३॥
    आमरण वारी घडो । संतचरणीं प्रेमा जडो ।
    अक्षय्यीचा वास घडो । श्रीगोदेच्या तीराला ॥४४॥
    प्रसंग याचना करण्याचा । मशीं नको आणूंस साचा ।
    समर्था दासगणूचा । अभिमान वाहावा मानसीं ॥४५॥
    मी सकल संतांचा चरणरज । माझी राखा तुम्ही लाज ।
    हेंचि मागणें आहे आज । पदर पसरुन तुम्हांतें ॥४६॥
    जैसी केलीस प्रेरणा । तैसेंच मी वदलों जाणा ।
    हे स्वामी गजानना ! । तुझें चरित्र लिहितां कीं ॥४७॥
    शेगांवचे मठांत । कांहीं होतें कागदपत्र ।
    ते * रतनसातें मजप्रत । आणूनियां दाखविले ॥४८॥
    त्यांच्या आधारें ग्रंथ लिहिला । कल्पनेच्या ना उपयोग केला ।
    म्हणून अधिक न्यूनाला । मी नाहीं कारण ॥४९॥
    झालें असल्या अधिकऊन । त्याची क्षमा गजानन ।
    करो सर्वदा मजलागून । हीच आहे विनंती ॥२५०॥
    शके अठराशें एकसष्टांत । प्रमाथिनाम संवत्सरांत ।
    चैत्रमासीं शुद्धांत । वर्षप्रतिपदेला ॥५१॥
    हा ग्रंथ कळसा गेला । शेगांव-ग्रामीं भला ।
    तो गजाननांनीं पूर्ण केला । प्रथम प्रहरीं बुधवारीं ॥५२॥
    स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    नौका होवो भाविकांप्रत । भवसिंधु तरावया ॥२५३॥
    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
    ॥ इति एकविंशोऽध्यायः समाप्तः ॥
    ॥ पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ॥
    ॥ सीताकांतस्मरण जयजय राम ॥
    ॥ पार्वतीपते हरहर महादेव ॥
    ॥समाप्त॥

    श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय २०


    || श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय २० ||

    श्री गजानन महाराजांनी लक्ष्मण हरी जांजळ यांस बोरीबंदरवर परमहंसाच्या रूपांत भेट दिली.


    ॥ श्रीगणेशाय नमः ॥
    जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा ।
    देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥
    तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं ।
    मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥
    माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून ।
    राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥
    यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष ।
    खर्‍या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥
    म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा ।
    पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥५॥
    असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर ।
    म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥६॥
    शेगांवींचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती ।
    आतां काय तेथें माती । राहिली आहे निव्वळ ॥७॥
    समुद्राचें आटल्या नीर । वा पुष्पतरूचा गेल्या भर ।
    कोण त्याचें करणार । कौतुक या जगामध्यें ॥८॥
    आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? ।
    देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥९॥
    ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती ।
    महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥१०॥
    जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ।
    ते आहेत भेटले परी । तेच ठायीं भाविकां ॥११॥
    तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ ।
    ऐसा जयांचा सिध्दान्त । दर्शन त्यांना तेथ होतें ॥१२॥
    ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां ।
    गणपत कोठाडे होता । एक भाविक गृहस्थ ॥१३॥
    हा रायली कंपनीचा । एजंट शेगांव दुकानीचा ।
    नित्य नेम होता त्याचा । दर्शनाचा श्रोते हो ॥१४॥
    अस्तमानीं प्रतिदिवशीं । यावें त्यानें मठासी ।
    बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥१५॥
    एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस ।
    उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥१६॥
    केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी ।
    शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥१७॥
    तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां ।
    हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१८॥
    उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी ।
    कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांहीं तरी ॥१९॥
    हे अभिषेक ब्राह्मणभोजनें । वरचेवरी न योग्य करणें ।
    दिलीं आपणां ईश्वरानें । चार पोरेंबाळें हो ॥२०॥
    फुटका मणि ना अंगावरती । मी लंकेची पार्वती ।
    गृहस्थाची ही का रीती ? । संचय करावा धनाचा ॥२१॥
    हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण ।
    तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥२२॥
    तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी ।
    उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥२३॥
    त्यांत तुझ्या बापाचें । काय जातें सांग साचें ।
    प्रेम अशाश्वताचें । वेडे ! हें बाळगूं नको ॥२४॥
    यामध्यें न कांहीं सार । धन भूचें भूमीवर ।
    येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ॥२५॥
    अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य ।
    त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ॥२६॥
    पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी ।
    म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥२७॥
    ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस ।
    तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥२८॥
    आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार ।
    सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥२९॥
    मुलें बाळें कोणाचीं । धनदौलत कोणाची ।
    तूं न वाही चिंता त्यांची । तें अवघें समर्थाचें ॥३०॥
    असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें ।
    त्या दसर्‍याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥३१॥
    या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची ।
    जडली शुध्द स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥३२॥
    लक्ष्मण हरी जाजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां ।
    बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥३३॥
    कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत ।
    हा समर्थाचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥३४॥
    घरच्या कांहीं कटकटीनें । वैताग त्याच्या घेतला मनें ।
    कांहीं व्यापारासंबंधानें । आला होता मुंबईस ॥३५॥
    असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं ।
    तों आगगाडीच्या धक्क्यावरी । एक भेटला परमहंस ॥३६॥
    आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा ।
    ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥३७॥
    तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य ।
    ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥३८॥
    तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी ।
    चारशें पानांची तयारी । करून उमरावतीला ॥३९॥
    गोपाळराव पेठकर । आणी बापटमास्तर ।
    यांचा कैंसा प्रकार । घडला तो आण मना ॥४०॥
    पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासी ।
    तो तुझ्या गेहासी । आला होता न सांग तें ॥४१॥
    पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? ।
    अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥४२॥
    उपदेश करून दोघांस । आणिले होते प्रसादास ।
    हें कैसेम विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥४३॥
    खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण ।
    म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥४४॥
    लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला ।
    तो पाहतां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥४५॥
    मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी ।
    प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥४६॥
    अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवासी ।
    भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥४७॥
    एक माधवमार्तंड जोशी । कळंब कसूर ग्रामासी ।
    आला मोजणी करायासी । जमिनीची श्रोते हो ॥४८॥
    हा सरकारी नौकर । होता रेव्हेन्यु आँफिसर ।
    त्याचा गजानन साधूवर । पूर्ण होता भरवंसा ॥४९॥
    दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली ।
    अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥५०॥
    आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थाचें दर्शन ।
    ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥५१॥
    जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी ।
    रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥५२॥
    तई तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून ।
    आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥५३॥
    मन नदीला पाणी भलें । आहे थोडकें आतां आलें ।
    पाही पाणी गढूळ झालें । म्हणून केली विनंती ॥५४॥
    जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊण नदीपार ।
    जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥५५॥
    शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी ।
    जोशी आंत बैसोनी । जाऊं लागेल शेगांवा ॥५६॥
    दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात ।
    जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥५७॥
    झंझावात बळावला । कडकडाट करी चपला ।
    मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥५८॥
    मेघ वर्षे मुसळधार । झंझावात सुटला खरा ।
    शेतकर्‍यांचिया छपरा । तो उडवूं लागला हो ॥५९॥
    शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण ।
    तुम्हीं आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥६०॥
    तई माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं ।
    बाहूं लागले समर्थासी । करुणायुक्त वचानें ॥६१॥
    हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां ।
    अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥६२॥
    कथा ऐकिली पुराणांत । जहाज बुडतां समुद्रांत ।
    त्यास संतानें देऊन हात । रक्षण केलें सर्वस्वीं ॥६३॥
    तूंही संत असामान्य । ब्रह्मवेत्ता करूणाघन ।
    करी आमुचें रक्षण । येऊन या पुरामध्यें ॥६४॥
    दमणींत आलें जीवन । बैल गेले घाबरोन ।
    मग जोशी पु्ढें होऊन । बोलते झाले शिपायास ॥६५॥
    तूं आतां मागें सर । अवलीयाचें भजन कर ।
    तेच नेतील आपणां पार । त्यांची चिंता करूं नको ॥६६॥
    जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता ।
    वाटेल तें करी आतां । तारी अथवा मारी आम्हां ॥६७॥
    कासरा दिला सोडून । दोघांनींही मिटले नयन ।
    तों काय घडलें वर्तमान । तें आतां परियेसा ॥६८॥
    ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी ।
    उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवच्या ॥६९॥
    ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां ।
    पाहा केवढी अगाध सत्ता । आहे अवलीया बाबाची ॥७०॥
    पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें ।
    जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥७१॥
    वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा ।
    दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥७२॥
    बाळाभाऊचियापासीं । ब्राह्मणभोजन घालण्यासी ।
    कांही रुपये अतिहर्षीं । जोशी देते जाहले ॥७३॥
    साकल्य कथिलें वर्तमान । बाळाभाऊलागुन ।
    हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥७४॥
    कां कीं मला रजा नाहीं । काम जरूरीचें पाही ।
    ऐसें सांगून लवलाही । जोशी गेले निघून ॥७५॥
    एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार ।
    हा करीतसे व्यापार । वर्‍हाडांत कापसाचा ॥७६॥
    यांस एक सालीं भला । दहा हजार तोटा आला ।
    त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥७७॥
    परी व्यापार सोडवेना । चिंता मनींची जाईना ।
    फायदा कांहीं होईना । त्याच्या मनाप्रमाणें ॥७८॥
    फायद्यासाठीं खटपट करी । नाना प्रकारें साजिरी ।
    स्वस्थ ना बसती व्यापारी । राहाती सदा प्रयत्नांत ॥७९॥
    हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त ।
    उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥८०॥
    तों इतक्यांत तेथें आला । एक भिकारी बुध हो भला ।
    भिक्षा कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥८१॥
    पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी ।
    डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥८२॥
    कंपवायूनें शरीर । कांपत होतें वरच्यावर ।
    त्यास पहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥८३॥
    जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी ।
    नको चढूस पायरी । ओसरीची ये वेळां ॥८४॥
    परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे ।
    येऊन वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥८५॥
    घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी ।
    भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥८६॥
    यादव म्हणे मनांत । भिकारी हा लोचट बहुत ।
    नको म्हणत असतां येथ । हा बैसला येवोनी ॥८७॥
    त्यातें पहात न्याहाळून । तईं तो भासला गजानन ।
    सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥८८॥
    दृष्टीस तेज अत्यंत । स्वरही त्यांच्या परी सत्य ।
    फरक इतुकाच होता त्यांत । कंप होता तनूला ॥८९॥
    तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें ।
    तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥९०॥
    हा जरी मानूं गजानन । तरी ते गेले समाधिस्थ होऊन ।
    आतां महाराज कोठून । पडतील आमुच्या दृष्टीशीं ? ॥९१॥
    कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्‍याकारण ।
    श्रीगजानन समजून । उहापोह ज्याचा नको ॥९२॥
    पैसे घेतले भिकार्‍यानें । आणिक कांहीं देई म्हणे ।
    श्रीगजाननकारणें । शेरणी वाट गुळाची ॥९३॥
    ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार ।
    तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥९४॥
    त्याचा विचार अंतरीं । करून देई कांहीं तरी ।
    रुपये मजला लवकरी । काढ पाकीट खिशांतून ? ॥९५॥
    ऐसें भिकारी बोलतां । सुभेदार झाला देता ।
    कांहीं रुपये तत्त्वतां । पाकिटाचे काढून ॥९६॥
    भिकारी म्हणे ते अवसरीं । संतुष्ट मी इतुक्यावरी ।
    होत नाहीं दे लवकरी । आणखी रुपये कांहीं मला ॥९७॥
    पुन्हां रुपये काढिले । भिकार्‍यासी अर्पिले ।
    तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥९८॥
    यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला ।
    तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥९९॥
    संशय गजाननाविषयीं । कां घेतोस चित्तीं पाही ? ।
    कपडे काढून उभा राही । माझ्यापुढें ये वेळां ॥१००॥
    तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार ।
    माझी तेणें होईल दुर । व्याधि तुझी यादवा ॥१॥
    तूं मजला मुलापरी । कां रे लाजसी अंतरीं ? ।
    ऐसें म्हणून पाठीवरी । हात फिरविला तयांनीं ॥२॥
    फिरविला नखशिखान्त । अंगावरून त्यानें हात ।
    तों आले इतक्यांत । असिरकर ओसरीला ॥३॥
    रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी ।
    यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥४॥
    परी न थांग लागला । शेवटीं त्यानें निश्चय केला ।
    ऐसा आपुल्या चित्ताला । कीं हा असावा गजानन ॥५॥
    सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं ।
    फायदा होईल व्यापारासी । कांहीं तरी निःसंशय ॥६॥
    तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या ।
    विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७॥
    विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत ।
    तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥८॥
    आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला ।
    तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥९॥
    समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं ।
    निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥११०॥
    भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डाँक्टर ।
    त्याची तेल्हार्‍याच्यावर । बदली असे जाहली ॥११॥
    म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला ।
    सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥१२॥
    गाडी केली तेल्हार्‍याची । तयारी केली निघण्याची ।
    वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥१३॥
    बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीतीं ।
    अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥१४॥
    तुम्ही आजपर्यंत । गेलां न येथून उपोषित ।
    आज ऐसें विपरीत । कां हो मनीं आणिलें ? ॥१५॥
    ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत ।
    कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥१६॥
    आज रात्रीं प्रसाद घेतों । मागल्या रात्रीं निघून जातों ।
    नसतां आग्रह मला तो । तुम्ही न करा ये काळीं ॥१७॥
    बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्‍यासी डाँक्टर भला ।
    घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥१८॥
    रात्र होती अंधारी । महा भयंकर साजरी ।
    वाटे निशा शोक करी । निज पतीच्या वियोगें ॥१९॥
    तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्‍याचा रस्ता चुकला ।
    कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥१२०॥
    गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार ।
    गाडी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥२१॥
    म्हणता झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला ।
    हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥२२॥
    खालीं उतरून जों पहात । तों अवघें दिसलें विपरीत ।
    अपशब्द बोलला बहुत । तो त्या गाडीवाल्याला ॥२३॥
    तूं तेल्हार्‍याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण ।
    आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥२४॥
    काय होतास दारू प्याला । म्हणून हा रस्ता चुकला ।
    वाट तुझ्या डोळ्यांला । दिसली कशी ना सांग मज ? ॥२५॥
    तेल्हार्‍याचा रस्ता थोर । आम्ही हमेशा वाहातों साचार ।
    मग आडमार्गावर । गाडी कैशी आली तुझी ? ॥२६॥
    ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां ।
    कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥२७॥
    मी हमेश भाडें करतों । तेल्हार्‍याहून येथें येतों ।
    वाटेल तेव्हां गाडी हांकतों । रस्ता अवघा माहीत मज ॥२८॥
    बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले ।
    तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्‍याचा ॥२९॥
    मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य ।
    प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥१३०॥
    बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला ।
    म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥३१॥
    हें भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण ।
    गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥३२॥
    तों तळ्याच्या दुसर्‍या बाजूला । घागरमाळांचा आवाज झाला ।
    डाँक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥३३॥
    गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर ।
    या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥३४॥
    तें त्यानें ऐकिलें । कांट्यांकुपाट्यांमधून नेलें ।
    नीट रस्त्याला लाविलें । या आपल्या गाडीस ॥३५॥
    हमरस्ता लागतां भली । डाँक्टरानें चौकशी केली ।
    तों ऐशापरी समजली । गोष्ट तया कवरातें ॥३६॥
    हें शेगांवचें शिवार । आहे अझून साचार ।
    मग म्हणाला डाँक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥३७॥
    सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला ।
    वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥३८॥
    मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें ।
    व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥३९॥
    आज प्रसाद ग्रहण करा । उद्यां जा हो तेल्हारा ।
    करूं नये कधींच खरा । प्रसादाचा इनकार ॥१४०॥
    समर्थाचे तुम्ही भक्त । म्हणून तुम्हां आणिले परत ।
    मानवाचे अवघे बेत । सिध्दीस जाणें अशक्य ॥४१॥
    संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी ।
    भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥४२॥
    दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्‍यासी ।
    आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥४३॥
    एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार ।
    तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥४४॥
    त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला ।
    बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥४५॥
    दिसूं लागलीं अवघीं हाडें । वरतीं नुसतें कातडें ।
    वैद्य आणले बडेबडे । परी न झाला उपयोग ॥४६॥
    मुलगें रडतां राहीना । दूधपाणी घेईना ।
    ज्वर मुळींच सोडीना । पाहा तयाच्या तनूतें ॥४७॥
    वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देई यासी ।
    हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥४८॥
    शक्याशक्य विचार । सुज्ञें करावा निरंतर ।
    उगीच पूल सागरावर । बांधावया जाऊं नये ! ॥४९॥
    ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां ।
    शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥१५०॥
    येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार ।
    पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥५१॥
    दिनकराचा अंतकाळ । आला होता अति जवळ ।
    घरचीं माणसें सकळ । लागलीं श्रोते रडावया ॥५२॥
    हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें ।
    मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥५३॥
    ऐशा स्थितिमाझारीं । रतनसानें पुत्र करीं ।
    घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥५४॥
    आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास ।
    शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥५५॥
    तुम्ही पावलां अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला ।
    मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥५६॥
    माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत ।
    तरी अवघ्या वर्‍हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥५७॥
    अमृतापरी तुझे चरण । आले सांगत आम्हां जन ।
    हे स्वामी गजानन । कृपा करा या बाला ॥५८॥
    पुत्र न माझा उठला जरी । मी डोकें फोडीन पायांवरी ।
    तुझ्या आज निर्धारीं । ऐसा निश्चय मनींचा ॥५९॥
    अमृततुल्य तुझी दृष्टी । त्याची करावी आज वृष्टी ।
    नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१६०॥
    त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला ।
    मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥६१॥
    नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी ।
    तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥६२॥
    समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? ।
    सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥६३॥
    दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत ।
    नवस असला श्रध्दायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥६४॥
    दादा कोल्हटकराचा । पुत्र राजा नांवाचा ।
    आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥६५॥
    कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची ।
    ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥६६॥
    ही असतां गरोदर । प्रसंग आला दुर्धर ।
    प्रसुतीची वेळ फार । कठीण स्त्रीजातीला ॥६७॥
    लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी ।
    प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥६८॥
    मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती ।
    तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥६९॥
    तो होतां नवज्वर । थकून गेले डाँक्टर ।
    औषध उपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥१७०॥
    थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला ।
    परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥७१॥
    चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी ।
    एकदां अकोल्या नेलें खरी । औषध तिला द्यावया ॥७२॥
    वैद्य विघानें नाना करिती । कोणी नळसंग्रहणी बोलती ।
    कोणी वैद्य ऐसें म्हणती । क्षय झाला मुलीस या ॥७३॥
    मेळ एकाचा एकाला । नाहीं मुळीं लागला ।
    मग पाटलानें विचार केला । आतां वैद्य गजानन ॥७४॥
    तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रति दिवसीं ।
    तीर्थ द्यावें प्यायासी । समर्थांच्या पायांचें ॥७५॥
    पिता मोठा निष्ठावंत । समर्थावरी अवघा हेत ।
    हळूहळू त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥७६॥
    तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी ।
    पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्‍याचें ॥७७॥
    निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव ।
    उपास्यपदीं भाव । उपासकें ठेवावा ॥७८॥
    रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा ।
    परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥७९॥
    वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार ।
    पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१८०॥
    औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत ।
    ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥८१॥
    त्या वाताची अखेरी । होती झाली मस्तकावरी ।
    मेंदु बिघडला निर्धारीं । गेली जाणीव मावळून ॥८२॥
    वेड्यापरी करावें । वाटेल तें बोलावें ।
    कधीं उपाशीं निजावें । कधीं बसावेम जेवत ॥८३॥
    कोणी म्हणती लागलें भुत । कोणी म्हणती रोग सत्य ।
    कांहीं वदू लागले तेथ । हा करणीचा प्रकार असे ॥८४॥
    कां कीं जितके असती जमेदार । त्यांचें असतें बाकडें फार ।
    दुबळा आपुला दावी जोर । चेटुककरणी करूनियां ॥८५॥
    औषधउपाय बहुत केलें । जाणतेही आणविले ।
    गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥८६॥
    पाटील घरचा श्रीमंत । तो सापडला अडचणींत ।
    म्हणून येता झाला ऊत । अवघ्यां त्या दांभिकांना ॥८७॥
    कोणी अंगांत आणावें । वेडाचें निदान करावें ।
    कांहीं तरी सांगावें । धनास्तव पाटलाला ॥८८॥
    तो बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी ।
    विचार त्यानें अखेरी । ऐशा रीती ठरविला ॥८९॥
    वैद्य आतां गजानन । जाणतां आतां गजानन ।
    देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१९०॥
    माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची ।
    आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥९१॥
    तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान ।
    मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥९२॥
    तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य ।
    समर्थ समाधीलागून । घालू लागली प्रदक्षिणा ॥९३॥
    गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्गुरुराया ।
    वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥९४॥
    खर्‍या खर्‍या संतांची । सेवा न जाई वायां साची ।
    परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥९५॥
    समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर ।
    बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥९६॥
    हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी ।
    त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥९७॥
    बाळाभाऊ जेव्हां गेले । तेव्हां नारायणा स्वप्न पडलें ।
    नांदूरें ग्रामीं भलें । तें थोडें सांगतों ॥९८॥
    हे माळी नारायणा । तूं शेगांवास करी गमना ।
    रक्षण्या भाविक जनांना । ऐसें मला वाटतें ॥९९॥
    ऐसें स्वप्नीं सांगून । निघून गेले गजानन ।
    म्हणून आले नारायण । शेगांवामाझारीं ॥२००॥
    कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं ।
    यांची समाधि झाली पाही । चैत्र शुध्द षष्ठीला ॥१॥
    पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण ।
    संतसेवेचें महत् पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥२॥
    श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा ।
    अंबरींच्या चांदण्यांचा । हिशोब कोणा न लागे कधीं ॥३॥
    मी अज्ञान पामर । मति नाहीं तिळभर ।
    मग हा लीलासागर । मुखीं केवीं वर्णू हो ! ॥४॥
    त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें ।
    लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥५॥
    ती लेखणी ज्याच्या करीं । तोंच अक्षरें काढी सारीं ।
    निमित्ताकारण होतें खरी । लेखणी ती लिहावया ॥६॥
    तैसेंच येथें झालें । मी लेखणीचें काम केलें ।
    लिहिते लिहविते स्वामी भले । श्रीगजानन महाराज ॥७॥
    त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन ।
    येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥८॥
    स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    आतां आला कळसाप्रत । कळसाध्याय पुढें असे ॥२०९॥
    शुभं भवतु ॥
    श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
    ॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥

    श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १९


    || श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १९ ||

    श्री गजानन महाराज हरी पाटलांना घेऊन श्रीविठ्ठलास भेटावयास पंढरीला गेले.


    ॥ श्रीगणेशाय नमः ॥
    जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा ।
    माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥
    हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती ।
    माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥२॥
    खर्‍या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता ।
    याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥३॥
    मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका ।
    हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥४॥
    महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ ।
    जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥५॥
    तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां ।
    मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥६॥
    माझ्या सन्माननीय वडिलानें । जीं जीवन्मुक्‍ताचीं लक्षणें ।
    लिहिलीं अनुभवानें । त्याची प्रत्यक्ष मूर्ति ही ॥७॥
    माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण ।
    आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥८॥
    तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली ।
    काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥९॥
    जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला ।
    या भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥१०॥
    म्हणे काम ना माझें ये ठाईं । मी न आलों मागण्या कांहीं ।
    तारवाला शिपाई । वाट पहातो काय हें ? ॥११॥
    त्याचें गूध कळेना । पुसण्या छाती होईना ।
    निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥१२॥
    तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही ।
    तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥१३॥
    तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्‍रुर ।
    मुनसफीच्या हुद्दयावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥१४॥
    तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला ।
    त्या काशिनाथ पंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥१५॥
    असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी ।
    गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥१६॥
    ही भोसल्याची राजधानी । पूर्वकालीं होती जाणी ।
    त्या शहराची आज दिनीं । दैना झाली विबुध हो ॥१७॥
    स्वातंत्र्यरुपी प्राण गेला । खरा धनी याचक ठरला ।
    परक्यांचा बोलबाला । झाला जया शहरांत ॥१८॥
    गज घोडे पालख्या अपार । नाहींशा झाल्या साचार ।
    रस्त्यानें फिरे मोटार । अति जोरानें विबुध हो ॥१९॥
    असो हा महिमा काळाचा । नाहीं दोष कवणाचा ।
    वाडा गोपाळ बुटीचा । होता सिताबर्डीवर ॥२०॥
    त्या भव्य सदनांत । नेऊन ठेविले सद्‌गुरुनाथ ।
    जैसा वाघ किल्ल्यांत । कोंडोनिया टाकावा ॥२१॥
    बुटीचा ऐसा विचार । या सिताबर्डीवर ।
    महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥२२॥
    अक्रूरानें कृष्णाला । जैसा मथुरेमाजीं नेला ।
    तोच प्रकार येथें झाला । काय वर्णन करावें ? ॥२३॥
    शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित ।
    विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥२४॥
    कुडीमधून गेला प्राण । कोण पुसे तिजलागून ? ।
    तैसें समर्थांवांचून । शेगांव हें प्रेत पहा ॥२५॥
    तुम्ही गांवचे जमेदार । करा याचा विचार ।
    बुटी मोठा सावकार । तेथें न आमुचा लाग लागे ॥२६॥
    टक्कर हत्तीहत्तींची । होणें आहे योग्य साची ।
    येथें आम्हांसम कोल्ह्याची । नाहीं मुळीं किंमत॥२७॥
    जंबुमाळीसी लढायाला । मारुती हाच योग्य ठरला ।
    जिंकावया कर्णाला । झाली योजना अर्जुनाची ॥२८॥
    तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें ।
    आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥२९॥
    इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत ।
    जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥३०॥
    महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी ।
    या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥३१॥
    तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना ।
    अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥३२॥
    बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी ।
    श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥३३॥
    रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन ।
    परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥३४॥
    जाऊं न देई दर्शना । शेगांवचे लोकांना ।
    बिगरपरवानगी श्रीमंतसदना । जातां नये कवणासी ॥३५॥
    शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले ।
    परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेच आले परत ॥३६॥
    इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळी बरोबरी ।
    घेऊन निघाला नागपुरीं । समर्थासी आणावया ॥३७॥
    बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत ।
    त्या गोपाळबुटीप्रत । येणें रीतीं तें ऐका ॥३८॥
    अरे गोपाळा पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं ।
    तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥३९॥
    तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार ।
    तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥४०॥
    तुझ्या धनाच्या जोरावरी । उडया या जाण निर्धारी ।
    तो मनगटाच्या बळावरी । नेईल मजला येथून ॥४१॥
    हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला ।
    परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥४२॥
    गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी ।
    पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥४३॥
    ताटें चांदीचीं अवघ्यांस । शिसमचे पाट बसण्यास ।
    होत्या पातळ पदार्थांस । वाटया जवळ चांदीच्या ॥४४॥
    नानाविध पक्वान्नें । होतीं भोजनाकारणें ।
    मध्यभागीं आसन त्यानें । मांडिलें समर्थ बसण्यास ॥४५॥
    ऐशी बुटीची श्रीमंती । तिचें वर्णन करुं किती ? ।
    ज्याला कुबेर बोलती । लोक नागपूर प्रांतींचा ॥४६॥
    असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत ।
    तो महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥४७॥
    वांसरा गाय पाहून । जैसी येई धांवून ।
    तैसें स्वामी गजानन । पाटलासाठीं धांवले ॥४८॥
    चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी ।
    तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥४९॥
    समर्थ जाऊं लागले । तें गोपाळानें पाहिलें ।
    अनन्यभावें चरण धरिले । समर्थाचे येऊन ॥५०॥
    विक्षेप माझा गुरुराया ! । नका करुं या समया ।
    दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥५१॥
    तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेंसी ।
    तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥५२॥
    येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज ।
    पंक्तींत माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥५३॥
    आतांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी ।
    आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥५४॥
    भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ ।
    शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥५५॥
    भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी ।
    दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाडयांत ॥५६॥
    कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें ।
    परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥५७॥
    तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं ।
    माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया ! ॥५८॥
    तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें ।
    ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥५९॥
    आणखी एक पुत्र तुला । परम सद्‌गुणी होईल भला ।
    अंतीं जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे ! तूं ॥६०॥
    ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन ।
    त्या सिताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥६१॥
    हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी ।
    ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥६२॥
    त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें ।
    शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्‌गुरुभक्तीचें राज्य घरा ॥६३॥
    उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार ।
    त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥६४॥
    तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून ।
    शेगांवच्या मठा जाण । हरीपाटलासमवेत ॥६५॥
    धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत ।
    होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥६६॥
    अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं ।
    त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥६७॥
    श्रीवासुदेवानंद सरस्वती । कर्ममार्गी ज्याची प्रीति ।
    कृष्णातटाका ज्याची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥६८॥
    ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार ।
    बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्ध योगी ॥६९॥
    अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक ।
    मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥७०॥
    तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं ।
    चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥७१॥
    चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी।
    जमदग्नीची आहे दुसरी । प्रतिमा त्या स्वामीची ॥७२॥
    तो कर्‍हाडा ब्राह्मण । शुचिर्भूत ज्ञानसंपन्न ।
    हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥७३॥
    ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी ।
    तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥७४॥
    एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां ।
    हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥७५॥
    एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर ।
    एक मोगरा सुंदर । एक तरु गुलाबाचा ॥७६॥
    एक गंगाभागीरथी । एक गोदा निश्चिती ।
    एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥७७॥
    स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले ।
    आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥७८॥
    स्वामी येतां चिटकी थांबलि । दृष्टादृष्ट दोघां झाली ।
    तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥७९॥
    फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान ।
    स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥८०॥
    बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां ।
    संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥८१॥
    त्याचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून ।
    ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥८२॥
    ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला ।
    बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥८३॥
    ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे ।
    हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥८४॥
    स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण ।
    तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥८५॥
    सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान ।
    या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥८६॥
    हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं ।
    तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥८७॥
    अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां ।
    म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥८८॥
    येथें एवढीच खबरदारी । घ्यावी लागते जाण खरी ।
    परांकारणें दुरुत्तरीं । कदा त्यानें ताडूं नये ॥८९॥
    आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें ।
    भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥९०॥
    मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही ।
    त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा ! रे ॥९१॥
    दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां ।
    श्रवणीं-पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥९२॥
    मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून ।
    ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्ति-मार्गाला ॥९३॥
    या अंगासह जो भक्त करी । त्यालाच भेटे श्रीहरी ।
    भक्तिमार्गाची नये सरी । त्याचा विधि सोपा असे ॥९४॥
    परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण ।
    जेवीं गगनानें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥९५॥
    आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा ।
    या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥९६॥
    परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं ।
    योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥९७॥
    जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत ।
    त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥९८॥
    आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख ।
    धौती मुद्रात्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥९९॥
    कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा ।
    आधीं योग करणारांना । तरीच तो साधेल ॥१००॥
    या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें ।
    परी तें ज्ञान प्रेमाचें । *वीण असतां कामा नये ॥१॥
    जें जें कृत्य प्रेमावीण । तें तें अवघें आहे शीण ।
    म्हणून प्रेमाचें रक्षण । करणें तिन्ही मार्गांत ॥२॥
    काळा गोरा खुजा थोर । कुरुप आणि सुंदर ।
    हे शरीराचे प्रकार । त्याची न बाधा आत्म्यातें ॥३॥
    आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक ।
    शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ॥४॥
    तीच या तिन्ही मार्गांची । स्थिति तंतोतंत साची ।
    बाह्य स्वरुपें भिन्न त्यांचीं । परी मूळ कारण एक असे ॥५॥
    मुक्कामास गेल्यावर । मार्गाचा न उरे विचार ।
    जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥६॥
    पंथ चालण्या आरंभ झाला । परी मुक्कामास नाहीं गेला ।
    अशाचाच होतो भला । तंटा पंथाभिमानानें ॥७॥
    या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत ।
    मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥८॥
    वसिष्ठ वामदेव जमदग्नी । अत्री पाराशर शांडिल्य मुनी ।
    हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥९॥
    व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर ।
    उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥११०॥
    श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र गोरख जालंदर ।
    हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥११॥
    जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला ।
    तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥१२॥
    तीच प्रथा पुढें चालली । येथें न शंका घ्यावी मुळीं ।
    कर्ममार्गाची रक्षिली । बूज श्रीपादवल्लभें ॥१३॥
    नरसिंह सरस्वती यतिवर । तैसेच झाले साचार ।
    ठिकाण ज्यांचें गाणगापूर । वाडी औदुंबर ख्यात जगीं ॥१४॥
    नामा सांवता ज्ञानेश्वर । सेना कान्हु चोखा महार ।
    दामाजीपंत ठाणेदार । गेले भक्तिमार्गानीं ॥१५॥
    शेख महंमद श्रीगोंद्यांत । आनंदी स्वामी जालन्यांत ।
    सुर्जी-अंजनगांवांत । देवनाथ चाहाते योगाचे ॥१६॥
    तैसेंच आहे सांप्रत । कर्ममार्गीं वासुदेव रत ।
    मीं धरला भक्तिपंथ । आणिक बहुता जणांनीं ॥१७॥
    पळुसचे धोंडीबुवा । सोनगीरचा नाना बरवा ।
    जालन्याचे यशवंतरावा । भक्तिपंथ साध्य झाला ॥१८॥
    खाल्ला आम्मा ती विदेही । तेवीं शिर्डीचे बाबा सांई ।
    गुलाबरावांचे ठायीं । ज्ञानदृष्टि असे रे ॥१९॥
    पहा चांदूर तालुक्याचा । वरखेडें नामें ग्रामाचा ।
    आडकूजी नामें संत साचा । गेला याच वाटेनें ॥१२०॥
    मुर्‍हा गांवचें संतरत्‍न । झिंगाजी तो होय जाण ।
    तेवीं नागपूरचे ताजुद्दीन । भक्तिमार्गासी चहाते ॥२१॥
    या अवघ्या संतांचें । आचरण भिन्न प्रकारचें ।
    परी अधिकारी कैवल्याचे । ते बसले होउनी ॥२२॥
    मार्ग असो कोणताही । त्याचें मुळीं महत्त्व नाहीं ।
    जो मुक्कामास जाई । त्याचें कौतुक करणें असे ॥२३॥
    आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी ।
    कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥२४॥
    जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल ।
    आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥२५॥
    आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही ।
    निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥२६॥
    ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल ।
    त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥२७॥
    ज्यासी अनुताप झाला । ब्रह्मज्ञान सांगणें त्याला ।
    उगीच तर्कटी वात्रटाला । स्फोट त्याचा करुं नये ॥२८॥
    कोणी कांहीं म्हणोत । आपण असावें निवांत ।
    तरीच भेटे जगन्नाथ । जगद्‌गुरु जगदात्मा ॥२९॥
    ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला ।
    प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥१३०॥
    अष्टभाव दाटले । शरीरा रोमांच उमटले ।
    वैखरीचें संपलें । काम तेणें सहजची ॥३१॥
    मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर ।
    वर्‍हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥३२॥
    साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची ।
    ती होती महाराजांची । मनापासून भक्तीण ॥३३॥
    तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी ।
    डाळपीठ घेऊनी । स्वैंपाक करी अहोरात्र ॥३४॥
    जे येतील तयांना । साळु घाल भोजना ।
    येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥३५॥
    ती साळुबाई मठांत । आहे अझूनपर्यंत ।
    जी वैजापूरची असे सत्य । माहेर वाडेंघोडें जिचें ॥३६॥
    प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला ।
    तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥३७॥
    खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं ।
    त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥३८॥
    पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा ।
    होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥३९॥
    या धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी ।
    तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥१४०॥
    प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न ।
    गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥४१॥
    श्रोते विद्यार्थी ना तरी । अध्ययना जाती देशावरी ।
    शिकण्याऐवजीं परोपरी । करुं लागती चैन ते ॥४२॥
    चैनीमाजीं गुंतल्या मन । मग कशाचें अध्ययन ? ।
    बिरुड आंब्यालागून । लागतां नास रसाचा ॥४३॥
    आत्माराम नव्हता यापरी । विवेकसंपन्न सदाचारी ।
    विद्या अवघी करुन पुरी । आला निजदेशातें ॥४४॥
    स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी ।
    हजिरी ती द्यावयासी । श्रीगजानन महाराजा ॥४५॥
    तो वेद विद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता ।
    आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥४६॥
    त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती ।
    आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥४७॥
    ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान ।
    न होय सराफावांचून । किंमत त्या हिर्‍याची ॥४८॥
    शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी ।
    मधु टाकूनी मक्षिकेसी । जाणें कैसें आवडेल ? ॥४९॥
    प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून ।
    चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥१५०॥
    समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत ।
    पूजा अर्चा करण्याप्रत । सद्‌गुरुच्या समाधीची ॥५१॥
    मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली ।
    शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥५२॥
    इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर ।
    येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥५३॥
    भिल्लिणीनें रामाला । बोरें देऊन वश केला ।
    तैसाच प्रकार हाही झाला । म्हणून केलें वर्णन ॥५४॥
    स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर ।
    निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥५५॥
    ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण ।
    ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥५६॥
    मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा ।
    तेथील मारुतीपंत पटवार्‍याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥५७॥
    श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत ।
    पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजीनामें माळी होता ॥५८॥
    तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं ।
    गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥५९॥
    उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर ।
    खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांडयाच्या ॥६०॥
    राखणदार झोंपीं गेला । गर्दभासी आनंद झाला ।
    ते खाऊं लागले जोंधळ्याला । राशींत तोंड घालूनी ॥६१॥
    हा पांडया मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त ।
    म्हणून सद्‌गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥६२॥
    क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी ।
    अरे ! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥६३॥
    ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन ।
    महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥६४॥
    तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां ।
    म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥६५॥
    पिकाचें रक्षण करण्यासाठी । त्यानें ठेविलें आहे मसी ।
    विश्वासघात आज दिशीं । झाला त्याच्या माझ्या हातें ॥६६॥
    तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर ।
    रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥६७॥
    आतां समजूत मालकाची । कोण्या रीतीं घालूं साची ।
    पहा त्या वेळीं इमानाची । किंमत होती लोकांस ॥६८॥
    ना तरी हल्लींचे नोकर । निमकहराम शिरजोर ।
    नफातोटयाची तिळभर । काळजी न त्यांना मालकाच्या ॥६९॥
    तिमाजी तैसा नव्हता । हळहळ लागली त्याच्या चित्ता ।
    म्हणे काय जाऊन सांगूं आतां । मी पांडयाकारणें ॥१७०॥
    कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची ।
    उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥७१॥
    ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण ।
    तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥७२॥
    महाराज माझ्या झोंपेनीं । बुडविलें तुम्हांलागूनी ।
    दहावीस गांढवांनीं । येऊन रास खाल्ली कीं ॥७३॥
    ती नुकसान किती झाली । ती पाहिजे पाहिली ।
    खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥७४॥
    मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार ।
    वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥७५॥
    दर्शन घेऊन सद्‌गुरुचें । त्या गजानन महाराजांचें ।
    उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥७६॥
    ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला ।
    दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥७७॥
    महाराज होते असनावरी । जगू पाटील समोरी ।
    बाळाभाऊ बद्ध करीं । बसला जवळ पाटलाच्या ॥७८॥
    मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्य वदन ।
    तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥७९॥
    तुम्ही माझे भक्त होतां । मला राबण्या लावितां ।
    झोंपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥१८०॥
    मारुती काल रात्रीला । खळ्यांत तिमाजी झोंपीं गेला ।
    गाढवांचा सुळसुळाट झाला । ते रास भक्षूं लागले ॥८१॥
    म्हणून मी जागें केलें । जाऊन तिमाजीसी भले ।
    रास सांभाळण्या सांगितलें । आणि आलों निघून ॥८२॥
    ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणी ।
    मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥८३॥
    आम्हां सर्वस्वीं आधार । आपुलाच आहे साचार ।
    लेंकराचा अवघा भार । मातेचिया शिरीं असे ॥८४॥
    आमुचें म्हणून जें जें कांहीं । तें अवघेंच आहे आपुलें आई ! ।
    सत्ता त्यावरी नाहीं । तुम्हांवीण कवणाची ॥८५॥
    खळें आणि जोंधळा । अवघाची आहे आपला ।
    तिमाजी नोकर नांवाला । व्यवहारदृष्टीं आहे कीं ॥८६॥
    ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून ।
    लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥८७॥
    मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें ।
    खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥८८॥
    ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर ।
    आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥८९॥
    ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती ।
    आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥१९०॥
    छे ! छे ! वेडया ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस ।
    नोकरीवरुन खास । त्याचें वर्म सांगतों तुला ॥९१॥
    तिमाजी नोकर इमानी । खळ्यांत गाढवें पाहूनी ।
    दुःखी झाला असें मनीं । तें म्यां तेव्हांच जाणिलें ॥९२॥
    रात्रीची हकीकत । तुला सांगावया प्रत ।
    आला होता भीत भीत । सकाळीं ना तुजकडे ॥९३॥
    तैं तूं म्हणालास त्याला । मी जातों आहे शेगांवाला ।
    उद्यां सकाळीं खळ्याला । येऊनियां पाहीन ॥९४॥
    ऐसें गुरुवचन ऐकिलें। मारुतीसी चोज जहालें ।
    पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥९५॥
    गाढवें खळ्यांत पडलेलीं । कोणीं न त्या सांगितलीं ।
    तीं अंतर्ज्ञानें जाणिलीं । गजाननानें श्रोते हो ॥९६॥
    शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी ।
    असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥९७॥
    तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची ।
    त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥९८॥
    मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर ।
    त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥९९॥
    तो होता हमरस्ता । बाजार पेठेचा तत्त्वतां ।
    त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥२००॥
    नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें ।
    समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥१॥
    तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत ।
    साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥२॥
    ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला ।
    लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥३॥
    हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ ।
    ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥४॥
    वळ पाठ पोटावरी । उठते झाले निर्धारी ।
    परी ना हवालदार आवरी । मारतां हात आपुला ॥५॥
    ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून ।
    आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥६॥
    तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर ।
    उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥७॥
    कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी ।
    वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ॥८॥
    या कृत्यानें तुझा अंत । जवळीं आला अत्यंत ।
    आजारीच मोडितो पथ्य । मरावया कारणें ॥९॥
    तेंच तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें ।
    अजून तरी उघडी डोळे । माफी माग गुन्ह्याची ॥२१०॥
    हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें ।
    कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥११॥
    हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपेठ ।
    तोंडानें गोष्टी चावट । अचाट ऐसा करीत हा ॥१२॥
    ऐशा ढोंग्याला मारणें । ईश्वर जरी मानील गुन्हे ।
    तरी मग न्याया कारणें । जागाच नाहीं राहिली ॥१३॥
    तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले ।
    त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥१४॥
    एका पंधरवडयांत । हवालदाराचे अवघे आप्त ।
    होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥१५॥
    म्हणून अवघ्या लोकांनीं । साधूसमोर जपूनी ।
    वागावें प्रत्येकानीं । खरें कळेपर्यंत ॥१६॥
    नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवदा नदीचे कांठावर ।
    गांव अति टुमदार । त्याचें वर्णन करवेना ॥१७॥
    अनंतफंदी नांवाचा । कवि जेथें झाला साचा ।
    तेथील हरी जाखडयाचा । ऐका तुम्ही वृत्तान्त हा ॥१८॥
    हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण ।
    गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥१९॥
    तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी ।
    बसतां झाला पायापासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥२२०॥
    तों हजारों घेती दर्शन । कोणी ब्राह्मणभोजन ।
    कोणी खडीसाखर वांटून । नवस केलेला फेडिती ॥२१॥
    तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी ।
    येऊनियां पायापासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥२२॥
    कां कीं दैव खडतर । माझें आहे साचार।
    निवळ पर्वत खडकावर । हरळ उगवेल कोठोनी ? ॥२३॥
    आज अन्न मिळालें । उद्यांचें कोणीं पाहिलें ।
    ऐसें करीत संपले । दिवस माझे आजवर ॥२४॥
    संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण ।
    मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल ? ॥२५॥
    हे स्वामी गजानना ! । सच्चिदानंदा दयाघना ! ।
    संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥२६॥
    ती तूं पूर्ण करावी । मुलें लेंकरें मला व्हावी ।
    प्रथम बायको मिळावी । कुलीन आज्ञाधारक ॥२७॥
    ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त ।
    थुंकते झाले सद्‌गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥२८॥
    या हरी जाखडयानें । बावंच्या मागला मजकारणें ।
    म्हणून आले थुंकणें । या मूर्खाच्या अंगावर ॥२९॥
    संसारापासून सुटावया । लोक भजती माझ्या पाया ।
    यानें येथें येऊनियां । संसारसुख मागितलें ॥२३०॥
    पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी ।
    सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥३१॥
    ऐसें आपणासी बोलले । पुन्हां जाखडयासी पाहिलें ।
    जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥३२॥
    तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून ।
    होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥३३॥
    जा आतां परत घरा । सुखें करी संसारा ।
    करीत असावा परमेश्वर । आठव वेडया ! विसरुं नको ॥३४॥
    ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन ।
    दिलें हरी जाखडयाकारण । लग्न स्वतःचें करावया ॥३५॥
    हरी जाखडया संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं ।
    महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥३६॥
    ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार ।
    रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥३७॥
    बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर । होता त्याच्या बरोबर ।
    तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥३८॥
    हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत ।
    इगतपुरी तालुक्यांत । बुध हो ! नासिक जिल्ह्याच्या ॥३९॥
    वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करुं किती ।
    हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥२४०॥
    फलभारें तरुवर । वांकले असती अपार ।
    वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥४१॥
    असो या मुकन्या नाल्यापासीं । जवळ एका खोर्‍यासी ।
    एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥४२॥
    तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास ।
    लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥४३॥
    असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी ।
    योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥४४॥
    तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन ।
    गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥४५॥
    नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र ।
    तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥४६॥
    काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां ।
    कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥४७॥
    तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी ।
    ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥४८॥
    उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्त ।
    त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥४९॥
    बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी ।
    अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥२५०॥
    पोटीं ना अन्न तिळभर । बिर्‍हाड राहिलें बहु दूर ।
    कपीलधारेचें धरुन नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥५१॥
    तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां ।
    ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥५२॥
    तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी ।
    हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥५३॥
    षोडाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर ।
    त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥५४॥
    मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत ।
    योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥५५॥
    गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा ! ।
    सागरीचा सिंप किडा । मेरु पर्वता न जाय कधीं ॥५६॥
    नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून ।
    येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥५७॥
    जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला ।
    ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥५८॥
    तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी ।
    तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥५९॥
    त्या पाहून निमोणक्र । गेले धांवत साचार ।
    शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥२६०॥
    महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला ।
    आपुल्या नांव गांवाला । न सांगतां गेलाच कीं ॥६१॥
    महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण ।
    तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥६२॥
    नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती ।
    तूं मूळचाच मूढ मती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥६३॥
    म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! ।
    मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥६४॥
    धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत ।
    पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥६५॥
    ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले ।
    भिरभिरीं पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥६६॥
    कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं ।
    तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥६७॥
    मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण ।
    कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥६८॥
    तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला ।
    तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥६९॥
    हे अवघ्या सामर्थ्याची । खाण निःसंशय आहेत साची ।
    सार्वभौमपदाची । त्याच्या पुढें न किंमत ॥२७०॥
    जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी ।
    करणें पूजा-अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥७१॥
    योगाभ्यास ही समोरी । त्या खेडयाच्या आदरें करी ।
    त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥७२॥
    तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडा बहुत ।
    आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥७३॥
    एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसीं ।
    त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥७४॥
    म्हणून त्यानें समर्थाला । एकदां नवस ऐसा केला ।
    जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥७५॥
    तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करान अर्पण ।
    मनोरथ त्याचे पूर्ण । केले गजाननस्वामीनें ॥७६॥
    दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली ।
    आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥७७॥
    तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण ।
    औषधोपचार केले जाण । परी न आला गुण कांहीं ॥७८॥
    नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली ।
    धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥७९॥
    ती स्थिति पाहून । तुकारामा झाली आठवण ।
    नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥२८०॥
    तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया ।
    अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥८१॥
    ऐसा वचनबद्ध होतांक्षणीं । नाडी आली ठिकाणीं ।
    हळूहळू नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥८२॥
    व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण-कुमार ।
    आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥८३॥
    तो नारायण अझूनी । आहे तया ठिकाणीं ।
    बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥८४॥
    हेंच सांगण्या लोकांप्रत । नारायण आहे जिवंत ।
    शेगांवीं त्या मठांत । संत-चरित्र ना कादंबरी ॥८५॥
    असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी ।
    घेऊन हरीपाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥८६॥
    जो सर्व संतांचा । ध्येयविषय साचा ।
    जो कल्पतरु भक्तांचा । कमलनाभ सर्वेश्वर ॥८७॥
    जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती ।
    जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥८८॥
    पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान ।
    गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राउळीं ॥८९॥
    हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था ।
    हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥२९०॥
    तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर ।
    जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥९१॥
    आतां अवतार-कार्य संपलें । हें तूं जाणसी वहिलें ।
    पुंडलीक वरदा विठठले । जाया आज्ञा असावी ॥९२॥
    देवा, मी भाद्रपद मासीं । जावया इच्छितों वैकुंठासी ।
    अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥९३॥
    ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणी ।
    अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥९४॥
    हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता ।
    अश्रु कां हो सद्‌गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां ? ॥९५॥
    किंवा मी कांहीं सेवेला । चुकलों आहे दयाळा ।
    म्हणून आपणां खेद झाला । तें सांगा लवलाही ॥९६॥
    महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर ।
    सांगितलें तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥९७॥
    तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्याभीतरीं ।
    इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥९८॥
    चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला ।
    तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥९९॥
    पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजीं भलें ।
    चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरीपाटलाचें ॥३००॥
    तो म्हणे मंडळीस । महाराज वदले पंढरीस ।
    संगत राहिली थोडे दिवस । माझी विठूच्या राउळीं ॥१॥
    पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला ।
    पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२॥
    गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी ।
    आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥३॥
    कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रथित ।
    चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥४॥
    त्याची पूजा-अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण ।
    दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥५॥
    तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला ।
    या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥६॥
    दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित ।
    तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥७॥
    हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी।
    ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥८॥
    जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले ।
    शरीरवस्त्रासी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥९॥
    चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास ।
    बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥३१०॥
    मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका ।
    कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥११॥
    ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण ।
    दिला मस्तकीं ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥१२॥
    शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास ।
    भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥१३॥
    प्राण रोधिता शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला ।
    सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥१४॥
    देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन ।
    स्वामी समाधिस्त पाहून । लोक हळूहळूं लागले ॥१५॥
    पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ ।
    ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥१६॥
    गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी ।
    गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥१७॥
    गेला आमुचा विसांवा । गेला आमुचा सौख्यठेवा ।
    विझाला हा ज्ञानदिवा । कालरुपी वार्‍यानें ॥१८॥
    अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? ।
    कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥१९॥
    मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा बंकटलाल ।
    ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामीचा जो असे ॥३२०॥
    श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी ।
    विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतीं श्रोते हो ॥२१॥
    आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस ।
    हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥२२॥
    आतां पुढें ही मूर्ति । लोपणार आहे निश्चिती ।
    अस्तमानापर्यंत ती । लोकांची ती वाट पहा ॥२३॥
    ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल ।
    नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥२४॥
    गोविंदशास्त्री डोणगांवचे। एक विद्वान् होते साचे।
    ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतीं ॥२५॥
    त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी ।
    तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२६॥
    त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया ।
    पहा लोणी ठेवोनियां। येधवां मस्तकीं स्वामीच्या ॥२७॥
    लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं ।
    जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥२८॥
    तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलता ।
    एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥२९॥
    निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित ।
    आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥३३०॥
    तें अवघ्यांस मानवलें । स्वामीपुढें आदरें भलें ।
    भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥३१॥
    दुरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत ।
    आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥३२॥
    तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला ।
    लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामीचें ॥३३॥
    रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार ।
    सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥३४॥
    रंगवल्या नानापरी । काढू लागल्या चतुर नारी ।
    दीपोत्सव झाला भारी । त्या शेगावग्रामाला ॥३५॥
    मूर्ति ठेविली रथात । मिरवणूक निघाली आनंदात ।
    रात्रभरी शेगावात । तो ना थाट वर्णाचे ॥३६॥
    वाद्यांचे नाना प्रकार । दिंड्या मिळाल्या अपार ।
    होऊं लागला भगनगजर । विठ्ठलाच्या नावाचा ॥३७॥
    तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळू लागले ।
    फूलांखाली झाकून गेले । श्री गजानन महाराज ॥३८॥
    बर्फीपेढ्यांस नाही मिती । लोक वाटती खिरापती ।
    कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥३९॥
    ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगावी निघून अखेर ।
    उदयास येता दिनकर । परत आली मठात ॥४०॥
    समाधीच्या जागेवरी । मूर्ती नेऊनी ठेविली खरी ।
    रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥४१॥
    पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर ।
    भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नावाचा ॥४२॥
    जय जय अवलीया गजानना! । हे नरदेहधारी नारायणा ।
    अविनाशरूपा आनंदघना । परात्परा जगत्पते ॥४३॥
    ऐशा भजनाभीतरी । मूर्ति ठेविली आसनावरी ।
    उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणे ॥४४॥
    अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण ।
    ’जय स्वामी गजानन’ । औइसे मुखे बोलोनी ॥४५॥
    मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार ।
    शिळा लावूनी केले द्वार । बंद भक्तांनी शेवटी ॥४६॥
    दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ ।
    घेऊनी गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥४७॥
    खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा ।
    सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥४८॥
    स्वस्ती श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामे ग्रंथ ।
    भाविका दावो सत्पथ । भक्ती हरीची करावया ॥३४९॥
    शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
    ॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥

    श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १८


    || श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १८ ||

    श्री गजानन महाराजांनी पंढरीस बापू काळ्याला श्रीविठ्ठल स्वरूपांत दर्शन दिले.


    ॥ श्रीगणेशाय नमः ॥
    जयजयाजी चिद्रिलासा । हे गोविंदा श्रीनिवासा ।
    हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥१॥
    हे केशवा केशीमर्दना । हे माधवा मधूसुदना ।
    हे पूतनाप्राणशोषणा । पांडुरंगा रुक्मिणीपते ॥२॥
    काय माझ्या आहे मनीं । तें तूं जाणसी चक्रपाणी ।
    तेंच का रे तुजलागुनी । बोलून दावूं पद्मनाभा ॥३॥
    भक्त जी जी इच्छा करी । ती तूं पुरविसी श्रीहरी ।
    ऐसें पुराणाभीतरीं । आहे वर्ण्न बहुसाळ ॥४॥
    म्हणून माझ्या मनोरथा । पूर्ण करा पंढरीनाथा ।
    सोडा मनींची कठोरता । दासगणू हा तुझा असे ॥५॥
    अकोटाचे शेजारीं । मुंडगांव नामें एक नगरीं ।
    तेथें बायजा नामें खरी । समर्थाची भक्तीण असे ॥६॥
    हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य ।
    शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥७॥
    बायजाचे बाळपणीं । लग्न झालें होतें जाणी ।
    ललाटीं जें विधात्यांनीं । लिहिलें असेल तेंच घडे ॥८॥
    बायजा आली तारूण्यांत । गर्भाधान करण्याप्रत ।
    घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥९॥
    परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ होता भला ।
    तेणें जनकजननीला । शिक झाला अनावर ॥१०॥
    बायजेकडे पाहून । जननी करी रोदन ।
    माझ्या बाईचें तारूण्य । वांझ पाहूं राहातें ॥११॥
    भुली म्हणे शिवरामासी । बायजा न ठेवा ऐशी ।
    दुसरा नवरा करून इसी । देणें आहे भाग पाहा ॥१२॥
    शिवराम म्हणे त्यावर । ऐसा नको सोडूं धीर ।
    हा पुरुषत्वाचा प्रकार । खरा एकदम कळेना ॥१३॥
    कांहीं दिवस वाट पाहूं । नको ऐसी अधीर होऊं ।
    बायजासी येथेंच ठेवूं । तिच्या सासुरवाडीला ॥१४॥
    नपुसकत्व अधोपरी । आलें असेल त्याला जरी ।
    तें औषधानें होईल दुरी । वाट पाही यास्तव ॥१५॥
    ऐसें उभयतां बोलून । बायजासी तेथें ठेवून ।
    आले मुंडगांवाकारण । आपुल्या घरातें ॥१६॥
    बायजीचें वय पंधरासोळा । वर्ण काळासावळा ।
    तारुण्यानें मुसमुसला । होता जिचा शरीरभाग ॥१७॥
    डोळे नाक पाणीदार । बांधा उंच मनोहर ।
    जिला पाहातां अंतर । कामुकाचें मोहित होई ॥१८॥
    तिच्या थोरल्या दिरासी । पाहूनियां बायजासी ।
    इच्छा जाहली मानसीं । संभोग तिचा करावया ॥१९॥
    त्यानें प्रयत्न केले नाना । वळवावया तिच्या मना ।
    म्हणूं लागला क्षणक्षणा । ऐसें बायजाकारणें ॥२०॥
    हताश ऐशी मुळीं न होई । मीच तुला पतीचे ठायीं ।
    आमरण करीन पाही । तुझें वेडे संगोपन ॥२१॥
    झुरणें दे हें सोडून । आनंदित ठेवी मन ।
    वेडे आजपासून । मीच नवरा समज तुला ॥२२॥
    ऐसें त्यानें सांगावें । चाळे नाना करावें ।
    कांहीं आमिष दावावें । चित्त तिचें भुलवाया ॥२३॥
    परी उपयोग होईना । बायजीच्या न हें येई मना ।
    ती म्हणे हे नारायणा ! । कां रे दैन्य मांडलेंस ? ॥२४॥
    बाळपणापासून । ध्याइले मीं तुझे चरण ।
    त्याचेंच कां हें मजलागून । फल दृष्टीं पडावें ? ॥२५॥
    जयाचा मीं हात धरिला । तो ना पुरुष कळून आला ।
    दैवयोग समजून चुकला । संसार नशिबीं नाहीं मम ॥२६॥
    बरें झालें तुझ्याठायीं । चित्त आतां रमेल पाही ।
    कृपा करीरे शेषशायी । स्पर्श पुरुषाचा न होवो मला ॥२७॥
    ज्येष्ठ दीर एके दिवसीं । येता झाला बायजापासीं ।
    आपला हेतु कळविण्यासी । रात्रीचिया समयाला ॥२८॥
    तों बायजानें इनकार । करून केलें उत्तर ।
    कैसी लाज तिळभर । नाहीं उरलीं चित्तीं तुझ्या ॥२९॥
    तूं माझा ज्येष्ठ दीर । पित्यापरीस साचार ।
    सोडा हा अविचार । स्वैर ऐसा होऊं नको ॥३०॥
    ह्या तियेच्या भाषणा । तो ना आणी मुळीं मना ।
    होतां कामाची वासना । नीति विलया जातसे ॥३१॥
    अंगावरी टाकण्या हात । जों तो पाही इतक्यांत ।
    तयाचा तो थोरला सुत । माडीवरून पडला हो ॥३२॥
    खोक पडली डोक्यासी । बायजेनें धरिलें त्यासी ।
    बसवून आपुल्या मांडीसी । औषध लावूं लागली हो ॥३३॥
    बायजा म्हणे ज्येष्ठ दीरा । या गोष्टीचा विचार करा ।
    अभिलाष तो नाहीं बरा । परस्त्रियेचा केव्हांही ॥३४॥
    मुलगा पडलेला पाहून । भय पावलें त्याचें मन ।
    अनुताप त्यासी झाला पूर्ण । केलेलिया कर्माचा ॥३५॥
    त्यानें नाद सोडिला । सदनीं निवांत राहिला ।
    पुढें शिवराम घेऊन गेला । कन्येस आपुल्या मुंडगांवीं ॥३६॥
    भुलाई म्हणे पतीसी । चला जाऊं शेगावांसी ।
    महाराजातें पुसायासी । पुढील भाकीत बायजेचें ॥३७॥
    तें मानेलें शिवरामासी । आला घेऊन कन्येसी ।
    महाराजांतें पुसायासी । आपुल्या त्या कांतेसह ॥३८॥
    बायजा घातली पायांवर । केली विनंति जोडून कर ।
    कृपा करा या मुलीवर । पुत्र पौत्र द्यावे हिला ॥३९॥
    तें समर्थांनीं ऐकिलें । शिवरामासी हांसत वदले ।
    अरे नशिबीं नाहीं लिहिलें । विधात्यानें पुत्र हिच्या ॥४०॥
    जेवढे पुरुष जगतांत । तेवढे असती हिचे तात ।
    उगे न पडा फंदांत । लग्न हिचें करण्याच्या ॥४१॥
    तें ऐकतां शिवरामाला । अनावर शोक झाला ।
    घेऊन त्या बायजाला । परत आला मुंडगांवीं ॥४२॥
    परी त्या समर्थवचनांनी । बायजा आनंदली मनीं ।
    निष्ठा गजाननाच्या चरणीं । जडली तेव्हांपासून ॥४३॥
    समर्थांचा एक भक्त । पुंडलिक नामें मुंडगांवांत ।
    त्याच्या संगें शेगांवांत । बायजा येऊं लागली ॥४४॥
    पहिल्या प्रथम अडथळा । जननीजनकें नाहीं केला ।
    शेगांवांस जाण्याला । पुंडलिकाचे बरोबर ॥४५॥
    त्यांना ऐसें वाटलें । साधुचरण इनें धरिले ।
    तेच तिच्या करतील भले । निजकृपेनें कल्याणा ॥४६॥
    पुरुषत्व देतील जामातासी । अशक्य ना कांहीं संतांसी ।
    ऐसा विचार मानसीं । करून राहिले स्वस्थ ते ॥४७॥
    पुंडलिकाचे बरोबरी । बायजा जाऊं लागली खरी ।
    तेणें पुकार जगभरी । ऐशा रीतिं जाहली ॥४८॥
    हें शेगांवच्या वारीचें । ढोंग आहे दोघांचें ।
    तरुणपणीं मानवाचें । मन परमार्थी लागेना ॥४९॥
    बायजा आहे तरणीज्वान । पुंडलिकासीही तारुण्य ।
    यांची वारी विषयभान । हीच आहे निःसंशय ॥५०॥
    परस्परें प्रीति जडली । विषयसुखाची नवाळी ।
    भोगण्या ही युक्ति केली । वाटते या उभयतांनीं ॥५१॥
    पुंडलिक जरी माळी असता । तरी हा संबंध योग्य होता ।
    बायजाच्या धरण्या हाता । कां कीं तरुण दोघेही ॥५२॥
    पुंडलिक आहे मराठी । ही माळ्याच्या आली पोटीं ।
    म्हणून यांची ताटातुटी । केलीच पाहिजे जातीस्तव ॥५३॥
    या दोघांचें अंतर । शुध्द होतें साचार ।
    नव्हता कामाचा विकार । मनीं उत्पन्न जाहला ॥५४॥
    भुलाई म्हणे बायजासी । तूं कां कारटे अहर्निशीं ।
    पुंडालिकाच्या घरा जासी । हें कांहीं कळेना ॥५५॥
    ऐशा तरुण वयांत । तुम्हां कशाचा परमार्थ ? ।
    कोल्हा न राही उपोषित । उंसाचिया फडामधीं ॥५६॥
    वा पाहून बाटुकाला । बैल नाहीं पुढें गेला ।
    कारटे आमुच्या नांवाला । काळें उगें लावूं नको ॥५७॥
    भुलाई म्हणे नवर्‍यासी । हिला नका ठेवूं ऐसी ।
    लावून द्यावे मोहतरासी । पाहा पोरगा माळ्याचा ॥५८॥
    ही पुंडलिकाच्या घरीं जाते । सदा त्यासी हितगुज करिते ।
    एकमेकां पाहून भरतें । येत दोघां प्रेमाचें ॥५९॥
    जाऊं चला शेगांवास । घेऊन या कारटीस ।
    सांगूं अवघे महाराजास । चाळे या बायजीचे ॥६०॥
    संतासी अवघें कळतें । ते सन्न्तीचे चाहाते ।
    पोटामाजीं कधीं न निघते । चंदनाच्या दुर्गंधी ॥६१॥
    भुला-शिवराम-बायजाबाई । पुंडलीक भोकर्‍या आला तोही ।
    चौघे येऊन लागले पाई । शेगांवीं श्रीसमर्थांच्या ॥६२॥
    पुंडलिकासी पाहून । बोलूं लागले दयाघन ।
    कीं बायजा तुझी बहीण । पूर्व जन्मींची पुंडलिका ॥६३॥
    लोक निंदा जरी करिती । तरी अंतर न द्यावें इजप्रती ।
    दोघें मिळून करा भक्ति । सच्चिदानंद हरीची ॥६४॥
    भुले आपुल्या पोरीस । लावूं नको भलता दोष ।
    हीं बहीण-भाऊ आहेत । मुळींच पूर्वजन्मींचें ॥६५॥
    शिवाय या बायजीला । कोठेंहि न नवरा भला ।
    ही न आली करायाला । संसार मुळीं जगामध्यें ॥६६॥
    ही राहील ब्रह्मचारी । अशीच गे जन्मवरी ।
    जनाबाई पंढरपुरीं । अशाच रीतीं राहिली गे ॥६७॥
    तिनें नामदेव गुरु केला । ही शरण आली आम्हांला ।
    माझ्या जनाबाईला । कोणी ना आतां छळावें ॥६८॥
    ऐसें समर्थांचें भाषण । शिवरामानें ऐकून ।
    गेला असे गहिंवरून । शब्द न कांही बोलवे ॥६९॥
    घेऊन आपुल्या मुलीला । शिवराम मुंडगांवासी आला ।
    पुढें बायजाच्या वारीला । अडथळा कोणी केला नसे ॥७०॥
    महाराज आपुल्या भक्ताप्रत । सदैव रक्षण करितात ।
    ते कसे, ही थोडक्यांत । गोष्ट सांगतों ये ठाई ॥७१॥
    भाऊ राजाराम कवर । एक होता डाँक्टर ।
    पहा खामगांवावर । दवाखान्याचा अधिकारी ॥७२॥
    त्यास दुर्धर फोड झाला । आणविला मोठ्या डाँक्टराला ।
    औषधपाणी करायाला । खामगांवामाझारीं ॥७३॥
    बुलढाणा अकोला उमरावती । येथून डाँक्टर आणिले असती ।
    शस्त्रक्रिया करण्याप्रती । त्या भाऊच्या फोडाला ॥७४॥
    नाना औषधें पोटांत दिलीं । विविध पोटीसें बांधिलीं ।
    शस्त्रक्रिया ही असे केली । त्या झालेल्या फोडाला ॥७५॥
    कशाचा ना उपयोग झाला । फोड वाढुं लागला ।
    वडील बंधूस धाक पडला । त्या भाऊच्या दुखण्याचा ॥७६॥
    भाऊ तळमळे शय्येवरी । व्याधि असह्य झाली खरी ।
    शेवटीं त्यानें अंतरीं । विचार ऐसा केला हो ॥७७॥
    आतां हाच उपाय । आठवावे सद्गुरुपाय ।
    याविणें दुसरी सोय । कांहीं नसे राहिली ॥७८॥
    पडल्या पडल्या जोडी हात । म्हणे धांव धांव हे सद्गुरुनाथ ।
    या लेंकराचा वृथा अंत । किमपि आतां पाहूं नका ॥७९॥
    ऐशी श्रोते विनवणी । करूं लागला क्षणोक्षणीं ।
    रात्र गेली उलटोनी । सुमारें समय एकाचा ॥८०॥
    तमानें भरलें अंबर । रात्रीचा तो शब्द किर्र ।
    कोल्हे-हुकेनें कांतार । दणाणून गेलें हो ॥८१॥
    तो एक दमणी आली । तट्ट्यावरी लागलेली ।
    गाडीस होती जुंपिली । जोडी खिलार्‍या बैलांची ॥८२॥
    कंठामाजीं घागरमाळा । वाजूं लागल्या खळखळा ।
    मागें पुढें सोडिला । होतां पडदा दमणीस ॥८३॥
    दवाखान्याच्या दारापाशीं । दमणी आली निश्चयेंसी ।
    डाँक्टर पाहात होता तिसी । पडून आपल्या शय्येवर ॥८४॥
    तों एक उतरला । ब्राह्मण दमणीला खालीं भला ।
    दार ठोठावूं लागला । डाँक्टराच्या बंगल्याचें ॥८५॥
    डाँक्टराच्या बंधूंनीं । दार उघडलें ते क्षणीं ।
    प्रश्न केला कोठूनी । आपण आलांत ये ठायां ? ॥८६॥
    ब्राह्मण बोले त्याकारण । माझें गजा नामाभिधान ।
    तीर्थअंगारा घेऊन । शेगांवाहून आलों मी ॥८७॥
    डाँक्टर भाऊ कवराला । जो का आहे फोड झाला ।
    हा अंगारा पाठविला । लावण्या त्या फोडासी ॥८८॥
    प्यावयासी दिलें तीर्थ । हें घ्या आपुल्या हातांत ।
    मी जातों आतां परत । वेळ न मशी राहावया ॥८९॥
    तीर्थअंगारा देऊन । निघून गेला ब्राह्मण ।
    त्या शोधाया कारण । भाऊनें शिपाई पाठविला ॥९०॥
    परी न पत्ता लागला । गाडी न दिसली कवणाला ।
    भाऊ मनीं घोटाळला । कशाचा ना तर्क चाले ॥९१॥
    फोडास लावितां अंगारा । तो तात्काळ फुटला खरा ।
    येऊं लागला भराभरा । पूं त्या श्रोते फोडांतून ॥९२॥
    एक घटका गेल्यावर । पूं गेला निघून पार ।
    पाहा किती आहे जोर । समर्थाच्या अंगार्‍याचा ? ॥९३॥
    भाऊस निद्रा लागली । व्याधीं पुढें बरी झाली ।
    हळूहळू शक्ति आली । भाऊ झाला पूर्ववत् ॥९४॥
    दर्शना गेला शेगांवास । तों समर्थ वदले ऐसें त्यास ।
    माझ्या गाडीबैलास । नुसता न चारा दिलास तूं ॥९५॥
    हें सांकेतिक भाषण । कळलें भाऊलागून ।
    हृदय आलें उचंबळून । त्या भाऊ कवराचें ॥९६॥
    त्या रात्रीचा ब्राह्मण । खचित माझा गजानन ।
    लेंकरासाठीं धांवून । खामगांवास आला हो ॥९७॥
    कवरें केलें अन्नदान । त्या व्याधीच्या निमित्त जाण ।
    अंतर्ज्ञानी असती पूर्ण । श्रीगजानन अवलिया ॥९८॥
    असो एकदां समर्थस्वारी । निघती झाली पंढरपुरीं ।
    त्या श्रीचंद्रभागेतीरीं । विठ्ठलासी भेटावया ॥९९॥
    होती मंडळी बरोबर । दिवस वारीचा साचार ।
    स्पेशल गाड्या वरचेवर । जाऊं लागल्या पंढरीला ॥१००॥
    जगू आबा पाटील हरी । बापुना व मंडाळी दुसरी ।
    सोडूनिया शेगांव नगरी । नागझरीला आले हो ॥१॥
    त्या गांवीं माळावर । आहे एक भुयार ।
    येथें गोमाजी नामें साधुवर । समाधिस्त झालासे ॥२॥
    झरे जिवंत पाण्याचे । आसपास त्या माळाचे ।
    आहेत म्हणून गांवाचें । नांव पडलें नागझरी ॥३॥
    हा गोमाजी बोवा साचा । गुरु महादाजी पाटलाचा ।
    प्रथम आशीर्वाद झाला साचा । शेगांवींच्या पाटीलवंशा ॥४॥
    म्हणून पाटील शेगांवचे । गोमाजीला वंदून साचे ।
    रस्त्यास लागती पंढरीचे । ऐसा त्यांचा परिपाठ ॥५॥
    या परिपाठे म्हणून । नागझरीसी येऊन ।
    अग्निरथांत बैसून । निघते झाले पंढरीला ॥६॥
    हरीपाटला बरोबरी । समर्थाची होती स्वारी ।
    बापुना आणि दुसरीं । माणसें पांचपन्नास ॥७॥
    आषाढ शुध्द नवमीचा । तो दिवस होता साचा ।
    समुदाय वारकर्‍यांचा । येऊं लागला पंढरीसी ॥८॥
    मेघ दाटले अंबरीं । क्वचित् कोठें भूमीवरी ।
    पर्जन्याची वृष्टी खरी । होऊं लागली श्रोते हो ! ॥९॥
    तें भुवैकुंठ पंढरपुर । गजबजून गेलें फार ।
    भरतीं येतां सागर । जेवीं जाय उचंबळोनी ॥११०॥
    प्रदक्षणेच्या रस्त्यावरी । टाळांची ती गर्दी खरी ।
    ' जय जय रामकृष्ण हरी ' । भक्त म्हणती उच्च स्वरें ॥११॥
    शब्द कवणाचा कवणाला । न ये ऐकावयाला ।
    ऐसा आनंदी आनंद चालला । तो वानूं कोठवर ॥१२॥
    नाथ निवृत्ति ज्ञानेश्वर । सांवता गोरा कुंभार ।
    श्रीतुकोबा देहूकर । सोपान मुक्ता जनार्दन ॥१३॥
    या संतांच्या पालख्या । पंढरीस आल्या देखा ।
    भक्तांनीं उधळिला बुक्का । आदर करायाकारणें ॥१४॥
    त्यायोगें आकाशांत । बुक्क्याचें जणूं झालें छत ।
    सुवास उठला घमघमीत । गर्दी तुळशीफुलांची ॥१५॥
    श्रोते त्या समयाला । सम आले पंढरीला ।
    उतरले जाऊन वाड्याला । त्या कुकाजी पाटलाच्या ॥१६॥
    हा प्रदक्षणेच्या वाटेवरी । वाडा चौफाळ्याशेजारीं ।
    दर्शनाला भीड खरी । झाली असे राउळांत ॥१७॥
    पोलिस हाताहातावरी । उभे राहिले रस्त्यांतरीं ।
    पथें चालले वारकरी । भजन करीत हरीचें ॥१८॥
    एकादशीस साचार । हरी पाटलाबरोबर ।
    बापुनाविना इतर । गेले दर्शना हरीच्या ॥१९॥
    बापुना मागें राहिला । तो होता स्नानासी गेला ।
    म्हणून त्यासी वेळ झाला । मंडळी गेली निघून ॥१२०॥
    स्नान करून आला घरीं । तों समजलें ऐशापरी ।
    दर्शनासी गेली सारी । आतांच मंडळीं विठ्ठलाच्या ॥२१॥
    मग तोही निघाला पळत पळत । दर्शनाचा धरून हेत ।
    राउळाच्या भोंवतीं अमित । गर्दी झाली लोकांची ॥२२॥
    मुंगीस वाट मिळेना । तेथें हा बापुना ।
    केवीं जाईल दर्शना । शिवाय गरिबी पदरांत ॥२३॥
    बापुना म्हणे मानसीं । हे विठ्ठला हृषीकेशी ।
    कां रे निष्ठुर झालासी ? । मजला देई दर्शन ॥२४॥
    तूं सांवत्या माळ्याकारण । अरणीं गेलास धांवून ।
    तेवीं येई राउळांतून । मज भेटाया पांडुरंगा ॥२५॥
    ' अरण ' होते आठ कोस । तैसें नव्हें येथें खास ।
    मी मंदिराच्या सान्निध्यास । उभा आहे वाटेवरी ॥२६॥
    तुला लोक म्हणतात । तूं अनाथांचा असशी नाथ ।
    मग कां रे देवा मजप्रत । उपेक्षिलें या वेळीं ? ॥२७॥
    ऐसा बहुत धांवा केला । शेवटीं बापुना हताश झाला ।
    परत बिर्‍हाडासी आला । अस्तमानाचे समयास ॥२८॥
    मुख झालें होतें म्लान । अवघ्या दिवसांचें उपोषण ।
    बापुनाचें अवघें मन । विठ्ठलाकडे लागलें ॥२९॥
    शरीर मात्र होतें घरीं । मन मंदिराच्या सभोंवरी ।
    फिरत होतें भिरीभिरी । याचें नांव ध्यास हो ॥१३०॥
    बापुनासी पाहून । हंसूं लागले अवघेजण ।
    हा बेटा अभागी पूर्ण । कळून आला आपणां ॥३१॥
    शेगांवाहून दर्शना । पंढरीसी आला जाणा ।
    येथें येऊन खेळ नाना । फिरला पाहात गांवामध्यें ॥३२॥
    याची दांभिक अवघी भक्ति । यास कशाचा श्रीपती ? ।
    ऐन वेळेला राहती । गैरहजर दुर्दैवी ! ॥३३॥
    कोणी म्हणाले बापुनाला । वेदान्त आहे अवघा आला ।
    तो कशाशीं दर्शनाला । जाईल सांगा राउळांत ॥३४॥
    त्याचा भगवंत हृदयांत । आहे सर्वदा खेळत ।
    वेदान्त्याचें ऐसें मत । दगडामाजीं काय आहे ? ॥३५॥
    आपण वेडे म्हणून । घ्याया गेलों दर्शन ।
    बापुनाचा नारायण । वाटेल तेथें उभा असे ॥३६॥
    मग दुसरा म्हणाला । मग हा येथें कशास आला ? ।
    कां शेगांवीं तयाला । भेटला नसता ईश्वर ? ॥३७॥
    अहो हे वेदान्ती । लोकां ज्ञान सांगती ।
    शब्द चावटी हमेश करिती । अनुभवाचा लेश नसे ॥३८॥
    सगुणोपासना झाल्या पूर्ण । मग होणार आहे ज्ञान ।
    न आल्यासी लहानपण । तरुणपणा येतो कसा ? ॥३९॥
    ऐसा उपहास तयाचा । प्रत्येकानीं केला साचा ।
    अवघ्यांपुढें एकट्याचा । टिकाव लागावा कुठूनी ? ॥१४०॥
    तो बापुना बसला उपोषित । दातांसी लावूनी दांत ।
    ते होते अवघे पहात । स्वामी निजल्या जागाहून ॥४१॥
    गरीबाचें सांकडें । साधूलाच एक पडे ।
    सत्संगती ज्याला घडे । तेच खरे भाग्यवान ॥४२॥
    समर्थ म्हणती बापुना । दुःख नको करूंस मना ।
    ये तुला रुक्मिणीरमणा । भेटवितों ये काळीं ॥४३॥
    तों महाराज उभे राहिलें । कटीं हात ठेविलें ।
    पाय खालीं जुळविलें । समचरण दावावया ॥४४॥
    तुळशीफुलांच्या माळा कंठीं । मूर्ति सांवळी गोमटी ।
    बापुनाच्या पडली दृष्टी । शीर ठेविलें पायांवर ॥४५॥
    पुन्हां जो पाहे वरीं । समर्थ दिसले पहिल्यापरी ।
    तेणें बापुनाच्या अंतरीं । अति आनंद जाहला ॥४६॥
    धोतर, पागोटें आणि शेला । जो घरीं दृष्टि पडिला ।
    तोच त्यानें पाहिला । दर्शना जातां राउळांत ॥४७॥
    इतर म्हणाले महाराजांस । तसेंच दर्शन आम्हांस ।
    होऊं द्या आम्हां आहे आस । पुनरपि श्रीच्या दर्शनाची ॥४८॥
    ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन ।
    बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥
    तें तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं ।
    ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥
    म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण ।
    निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥
    पहा समर्थांनीं बापुनाला । विठ्ठल साक्षात् दाखविला ।
    कुकाजीच्या वाड्याला । संतत्व हा खेळ नसे ॥५२॥
    संत आणि भगवन्त । एकरूप साक्षात ।
    गुळाच्या त्या गोडीप्रत । कैसें करावें निराळें ? ॥५३॥
    काला घेऊन अखेरी । मंडळी फिरली माघारी ।
    बापुनाच्या अंतरीं । दर्शन तें ठसावलें ॥५४॥
    याच पुण्यें करून । पुत्र झाला त्याकारण ।
    रसिक चतुर विद्वान । संतसेवा न जाई वृथा ॥५५॥
    पंढरीच्या प्रसादानें । पुत्र झाला त्याकारणें ।
    म्हणूनच नांव त्यानें । ठेविलें नामदेव बालकासी ॥५६॥
    कवठे बहादूर गांवाचा । एक माळकरी होता साचा ।
    तो वर्‍हाडप्रांतीचा । म्हणून उतरला वाड्यांत ॥५७॥
    तेथें आषाढी द्वादशीसी । मरी आली मुक्कामासी ।
    त्या पंढरपुरक्षेत्रासी । मग काय विचारितां ? ॥५८॥
    प्रेतामागें चाले प्रेत । पोलिस शिरती घरांत ।
    यात्रा काढून देण्याप्रत । डाँक्टराच्या हुकुमानें ॥५९॥
    वारकर्‍याला ओढिती । गाडीमाजीं बसविती ।
    चंद्रभागेच्या पार करिती । कुर्डुवाडी रस्त्याला ॥१६०॥
    हा कवठे बहादूरचा वारकरी । झाला मरीनें आजारी ।
    ढाळ होती वरच्यावरी । उलटी मुळींच थांबेना ॥६१॥
    गोळे हातांपायांसी । येऊं लागले बहुवशी ।
    कोण न जाई त्याजपाशीं । शुश्रुषा त्या करावया ॥६२॥
    पोलिसभयानें हें वृत्त । कळविलें ना कोणाप्रत ।
    शेगांवीचे समस्त । लोक जाया निघाले ॥६३॥
    वाडा घटकेंत मोकळा झाला । हा वारकरी मात्र होता पडला ।
    कठीण काळच्या समयाला । कोणी न येती उपयोगी ! ॥६४॥
    लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती ।
    तेथें एक रक्षण करती । संत अथवा देव हो ॥६५॥
    तो पाहून प्रकार । श्रीगजानन साधुवर ।
    म्हणाले हा ओसरीवर । निजला यास घेऊन चला ॥६६॥
    लोक म्हणती गुरुराया ! । हा बहुतेक मेला सदया ।
    याच्या नादीं लागतां वायां । संकट येईल आपणांतें ॥६७॥
    पन्नास माणूस बरोबर । आपल्या येधवां साचार ।
    मरीचा तो झाला जोर । सांप्रत या पंढरीसी ॥६८॥
    अशा स्थितींत ये ठाई । थांबणें हें कांहीं बरें नाहीं ।
    चला जाऊं लवलाही । चंद्रभागेच्या पलीकडे ॥६९॥
    तों महाराज म्हणती अवघ्यांला । तुम्ही कैसें खुळावला ? ।
    आपल्या देशबंधूला । सोडितां हें बरें नव्हे ! ॥१७०॥
    ऐसें वाटून जवल गेले । वारकर्‍याला करा धरलें ।
    त्यासी उठून बसविलें । आणि केलें मधुरोत्तर ॥७१॥
    चाल बापा ऊठ आतां । जाऊं आपल्या वर्‍हाडप्रांता ।
    वारकरी म्हणे गुरुनाथा ! । आतां वर्‍हाड कशाचें हो ? ॥७२॥
    समीप आला माझा अंत । जवळ नाहीं कोणी आप्त ।
    तई म्हणाले सद्गुरुनाथ । वेड्या ! ऐसा भिऊं नको ॥७३॥
    तुझें टळलें गंडांतर । ऐसें वदोन ठेविला कर ।
    त्या वारकर्‍याच्या शिरावर । ढाळ उलटी बंद झाली ॥७४॥
    वाटूं लागली थोडी शक्ति । उभा राहिला त्वरित गती ।
    संतानें ज्या धरिलें हातीं । त्यातें निजमनें यम नेई कसा ? ॥७५॥
    घटकेंत झाला पहिल्यापरी । मंडळीच्या बरोबरी ।
    चंद्रभागेच्या पैलतीरीं । आला समर्थासमवेत ॥७६॥
    आनंद झाला फार त्यासी । वंदी समर्थचरणांसी ।
    म्हणे दयाळा काढिलें मशी । दाढेंतून काळाच्या ॥७७॥
    ऐसा घडतां चमत्कार । भक्त करिती जयजयकार ।
    आले कुर्डुवाडीवर । निर्धास्तपणें सर्वही ॥७८॥
    पंढरीची करून वारी । आली शेगांवाप्रती सारी ।
    मंडळी ती बरोबरी । श्रीगजाननस्वामीच्या ॥७९॥
    एक कर्मठ ब्राह्मण । घ्याया आला दर्शन ।
    त्या शेगांवाकारण । श्रीगजाननस्वामींचें ॥१८०॥
    तयानें स्वामीची कीर्ति । निजदेशीं ऐकिली होती ।
    म्हणून आला दर्शनाप्रती । फार लांबून त्या ठायां ॥८१॥
    सोवळें ओंवळें त्याचें अती । तो होता मध्वमती ।
    खट्टू झाला परम चित्तीं । समर्थासी पाहातां ॥८२॥
    व्यर्थ आलों म्हणे येथ । या वेड्यासी वंदण्याप्रत ।
    हा भ्रष्टाचा आहे सत्य । सार्वभौम शिरोमणी ॥८३॥
    सोंवळें ओंवळें येथ मेलें । अनाचाराचें राज्य झालें ।
    अशा पिशाला म्हणूं लागले । साधू लोक हाय हाय ॥८४॥
    तो तया मठांत । काळें कुत्रें झालें मृत ।
    पडलें होतें त्याचें प्रेत । येण्याजाण्याच्या वाटेवरी ॥८५॥
    त्या श्वानातें पाहून । ब्राह्मण झाला मनीं खिन्न ।
    आणूं कसें जीवन । श्वान मध्यें पडला हा ॥८६॥
    याला न कोणी उचलीती । गांजा सदैव धुनकिती ।
    या वेड्यातें वंदिताती । " महाराज, महाराज, " म्हणून ॥८७॥
    जळो याचें साधुपण । मला बुध्दि कोठून ।
    झाली याचें दर्शन । घ्याया कांहीं कळेना ॥८८॥
    त्याचा संशय फेडावया । समर्थ आसन सोडोनियां ।
    येते झाले तया ठायां । जेथें होता ब्राह्मण ॥८९॥
    आणि म्हणाले तयाप्रत । पूजा करावी यथास्थित ।
    कुत्रें झालें नाहीं मृत । संशय उगा घेऊं नका ॥१९०॥
    तें ऐकून रागावला । निज समर्था बोलूं लागला ।
    अरे नाहीं वेड मला । तुझ्यासम लागलेलें ॥९१॥
    कुत्रें मरून झाला प्रहर । त्याचें प्रेत रस्त्यावर ।
    पडलें याचा विचार । तुम्हीं न कोणी केला कीं ॥९२॥
    ऐसें बोलतां विप्राला । समर्थांनीं जाब दिला ।
    आम्ही भ्रष्ट आम्हांला । तुमच्यासम ज्ञान नाहीं ॥९३॥
    परी खंति न करा तिळभर । पाणी आणाया घागर ।
    घेऊन चलावें सत्वर । माझ्यामागें विप्रवरा ॥९४॥
    ऐसें बोलून कुत्र्यापासीं । येते झाले पुण्यराशी ।
    स्पर्श पदाचा करतां त्यासी । कुत्रें बसलें उठोन ! ॥९५॥
    तों पाहता चमत्कार । ब्राह्मण झाला निरुत्तर ।
    म्हणे याचा अधिकार । थोर आहे देवापरी ॥९६॥
    मी व्यर्थ निंदा केली । योग्यता ना जाणली ।
    ऐसें म्हणून घातली । समर्थाच्या मिठी पायां ॥९७॥
    माझे अपराध गुरुवरा ! । आज सारे क्षमा करा ।
    वरदहस्त ठेवा शिरा । मी अनंत अपराधी ॥९८॥
    तूंच सोंवळा साचार । एक आहेस भूमीवर ।
    करण्या जगाचा उध्दार । तुम्हां धाडिलें ईश्वरानें ॥९९॥
    श्रोते त्याच दिवशीं भली । समाराधना त्यानें केली ।
    कुशंका मनाची पार फिटली । लीन झाला अत्यंत ॥२००॥
    प्रसाद घेऊन गेला परत । आपुल्या तो देशाप्रत ।
    समर्थ साक्षात् भगवंत । ऐसी प्रचीति आली तय ॥१॥
    स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
    भाविकां लाभो सत्पथ । हेंचि इच्छी दासगणू ॥२०२॥
    शुभं भवतु ॥
    श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
    ॥ इति अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥

    No comments: